पाणी वाचविण्याचा संदेश देत विद्यार्थ्यांचा ज्ञान-खेळातून आनंददायी सहभाग
| पाली /बेणसे | प्रतिनिधी ।
गोपाळकाला निमित्ताने सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा नवघर येथे ‘निपुण महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत पर्यावरणपूरक ‘निपुण हंडी’ उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. पारंपरिक दहीहंडीला शैक्षणिक व पर्यावरणपूरक स्वरूप देत नवघर शाळेने यावर्षी अभिनव उपक्रम राबविला. या निपुण हंडीमध्ये पाणी किंवा दही न वापरता लाह्या, चॉकलेट, पेन, पेन्सिल, खोडरबर यांसोबत निपुणपेटी अंतर्गत शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले. अक्षरे, अंक, प्राणी-पक्षी ओळख, शब्दकोडी, बेरीज-वजाबाकी तसेच विविध कृती व प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून वाचन, लेखन, संख्याज्ञान व विचारकौशल्याचा सराव करण्याची संधी मिळाली.
इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी प्राधान्याने या उपक्रमात सहभाग घेतला. त्यांच्यासोबत शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही हंडी तयार करणे, सजावट करणे व उपक्रमाच्या नियोजनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून निपुण हंडीला आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप दिले. या उपक्रमात वर्गशिक्षिका रुपाली लेंडवे यांनी सहभाग घेतला. विषयशिक्षिका वृषाली गुरव व मुख्याध्यापक संगीता बैकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी करण्यात आली. दरम्यान, इयत्ता तिसरीतील विद्यार्थी अनिश दळवी याने, नवघरमधील यावेळची हंडी वेगळीच आहे; खूप मज्जा आली, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली. पाणीबचत, पर्यावरण संवर्धन आणि निपुण शैक्षणिक कौशल्ये यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पर्यावरणपूरक निपुण हंडीच्या माध्यमातून पाणीबचतीचा संदेश देतानाच विद्यार्थ्यांना खेळातून शिकण्याची संधी मिळते. अशा उपक्रमातून आनंददायी शिक्षणाला चालना मिळून निपुण विद्यार्थी घडण्यास निश्चितच मदत होईल.
राजेंद्र अंबिके,
उपशिक्षक
