। खांब । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गावाच्या हद्दीत बिबट्याचे झालेले दर्शन व उमटलेले पावलांचे ठसे याबाबत शासकीय यंत्रणेने गंभीर दखल घेतली असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी (दि.5) बाहे गावाच्या हद्दीतील शेतजमिनीच्या भागात बिबट्याच्या पावलांचे ठसे उमटले असल्याचे येथील काही नागरिकांना आढळून आले. तर काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले असल्याची बातमी बघता बघता परिसरासह तालुक्यात पसरल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आणि भीतीदायक वातावरण निर्माण झाले.
सदरील बिबट्याच्या पावलांचे ठसे ही बातमी खरी आहे की निव्वळ अफवा आहे, याबाबत खातरजमा करण्यासाठी येथील जागरूक नागरिकांनी त्वरित वन विभागाशी व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था कोलाड यांच्याशी संपर्क साधला असता दोन्ही टीमचे पथक बाहे गावाच्या हद्दीतमध्ये आले. त्यांना काही प्राण्यांच्या पावलांचे उमटलेले ठसे व बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. अधिक संशोधनानुसार सदरील ठसे हे बिबट्याच्या पावलांचे असल्याचे निदर्शनास आले व या भागात बिबट्या फिरत असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
बिबट्याचे झालेले दर्शन व पाऊलखुणा यामुळे सर्वत्र भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी रोहा तालुका वनविभाग व अन्य शासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. बिबट्याची शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. तर रोहा वनपरीक्षेत्र अधिकारी महेंद्र दबडे, मेढा वनपाल सचिन ठाकूर, वनरक्षक शुभदा वरघडे व वनसेवक प्रकाश घडवले यांच्या नेतृत्वाखाली व स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी वन विभागाने अतिशय चांगली मोहीम हाती घेतली असून, विभागातील गावागावात देखील जनजागृती करण्यात येत आहे.
– मनोज थिटे, पोलीस पाटील, बाहे
