नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती
| माणगाव | वार्ताहर |
माणगावकरांचा शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या विकास आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळाली असून, आता नगरीचा नियोजनबद्ध असा सर्वांगीण सुंदर विकास होईल अशी माहिती नगरीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
माणगावकर गेली अनेक वर्षांपासून शहराच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळावी याच्या प्रतीक्षेत होते. अखेर माणगावकरांचे विकास आराखड्याचे स्वप्न साकार झाले असून, याची माहिती देण्यासाठी माणगाव नगरपंचायत कार्यालय याठिकाणी बुधवारी (दि.18) सायंकाळी नगरपंचायतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत मंजूर झालेल्या माणगाव विकास आराखड्याबाबतची माहिती नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, पाणीपुरवठा समिती सभापती कपिल गायकवाड,माजी उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, नगरसेवक दिनेश रातवडकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला महिला व बालकल्याण समिती सभापती नंदिनी बामगुडे, नगरसेवक अजित तारलेकर, स्वीकृत नगरसेवक सुनील पवार, माजी स्वीकृत नगरसेवक नितीन बामगुडे उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी माणगावच्या विकासासाठी विकास आराखडा मंजूर होण्याकरिता आमचे नेते ॲड.राजीव साबळे यांनी सततचा पाठपुरावा केला. ही आपल्या संपूर्ण माणगावकरांची मागणी होती. याकामी ॲड.राजीव साबळे व आदी सर्वांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माणगाव येथे 9 जूनला सीबीएससी शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला आले होते तेव्हा त्यांचे लक्ष वेधले होते. याची दाखल घेऊन केवळ 10 दिवसांत नगरविकास खात्याकडून माणगावच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे, असे सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना पाणीपुरवठा समिती सभापती कपिल गायकवाड यांनी माणगावच्या मंजूर झालेल्या विकास आराखड्याबाबत माहिती देताना सांगितले कि, सर्व प्रथम मी आमचे नेते ॲड.राजीव साबळे यांचे विशेष आभार व्यक्त करतो. हा आराखडा मंजूर व्हावा यासाठी गेली साडेतीन वर्ष ॲड.साबळे यांनी सततचा पाठपुरावा केला. त्यामध्ये त्यांना यश आले. या विकास आराखड्यामुळे माणगाव आता 20 ते 25 वर्षांनी विकासाबाबत पुढे गेला आहे.
यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष सचिन बोंबले यांनी सांगितले कि, अग्नीशामक दलाची गाडी जाता येईल अशा प्रकारच्या गृह प्रकल्प बांधकामांना नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर परवानगी देण्यात आली आहे. जुने इमारती यांना यापूर्वी ग्रामपंचायत असताना परवानगी देण्यात आली होती. माणगावमधील अनेक गृह प्रकल्पाचा सांडपाणी काळनदीत सोडले जात असल्याचा प्रश्नावर बोलताना बोंबले यांनी सांगितले याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्ठीने भुयारी गटारे काढण्यात येणार असून त्यानंतर हे सांडपाणी काळनदीत जाणार नाही याची खबरदारी नगरपंचायत घेईल. नगरसेवक दिनेश रातवडकर म्हणाले कि,या विकास आराखड्यामुळे माणगाव नगरीत सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचाही नगरपंचायतीचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
विकासाला चालना
या विकास आराखड्यामुळे आता स्वतंत्र भाजी, फळ, मच्छी मार्केटची उभारणी करण्यात येईल. यासाठी नगरपंचायतीने जागा निश्चित केली आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा आराखडा म्हणजे आनंदाची बाब आहे. यामुळे माणगाव शहराच्या विकासाच्या एक प्रकारे चालना मिळणार आहे. शहरात चांगल्या प्रकारचे रस्ते भुयारी गटारे करण्यात येणार आहेत.







