| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.11) जिल्ह्यात निर्दशने केली. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालय येथे दुपारी जमून सरकारविरोधात घोषणा दिल्या.
सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या 18 लाख कर्मचारी शिक्षकांनी 11 नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याकामी प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कामासाठी व आचारसंहिताच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत पुकारलेल्या बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. मात्र, सुधारीत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यासाठी व इतर प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि.11) दुपारी जिल्ह्यात निदर्शने करण्यात आली.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित पेन्शनचा प्रश्न 1 मार्च, 2024 च्या अमंलबजावणी दिनांकापासून सोडविण्याचे घोषित करण्यात आले. परंतु, त्यासंदर्भातील कार्यपद्धती व नियम विशद करणारे परिपत्रक/शासन निर्णय अद्याप पारीत झालेला नाही. जे कर्मचारी 1 मार्च, 2024 नंतर सेवानिवृत्त झाले आहेत, ते अद्याप पेन्शन लाभापासून वंचित आहेत.
राज्य सरकारचा आधार असणाऱ्या व सरकारची ध्येय धोरणे प्रभावीपणे राबविणारे सरकारी कर्मचारी -शिक्षकांची देखील आर्थिक निकड पुर्ण झाली पाहिजे याकरीता ठोस निर्णय होत नाहीत. नविन शैक्षणिक धोरणाचा पुर्नविचार करावा, विनाअनुदानित व सर्वच शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचारी यांना तात्काळ पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे, अशा विविध मागण्या निर्णयासाठी प्रलंबित असल्यामुळे निदर्शने आंदोलन करण्यात आले. निदर्शनानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथील तहसीलदार (सामान्य प्रशासन) शीतल दलाल यांना देण्यात आले.
यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा अध्यक्ष संदीप नागे, समन्वय समिती कार्याध्यक्ष तथा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ राज्य सहसचिव डॉ. कैलास चौलकर, कर्मचारी संघटना सरचिटणीस तथा निमंत्रक प्रभाकर नाईक, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, राज्य प्रतिनिधी परशुराम म्हात्रे, कोषाध्यक्ष दर्शना पाटील, अलिबाग अध्यक्ष दर्शना कांबळे, प्रणाली म्हात्रे, संतोष तावडे, सचिन जाधव, गोविंद म्हात्रे, रायगड जिल्हा पेन्शनर संघटना सरचिटणीस काशिनाथ जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थितीत होते.
सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने
