| श्रीवर्धन | वार्ताहर |
मार्च मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप आंदोलन छेडले होते. परंतु, अद्याप शासनाकडून या मागण्यांसंदर्भात अंतिम ठोस निर्णय न झाल्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी कर्मचारी, जि.प. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, न.प. कर्मचारी 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे सदर संघटनेचे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष रविदास जाधव यांनी सांगितले. तशा आशयाचे मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्याचे निवेदन श्रीवर्धनचे तहसिलदार महेंद्र वाकलेकर यांच्यामार्फत देण्यात आले आहे.
नवीन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे, सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाशर्त करणे, चतुर्थ श्रेणी व वाहन चालक पदे भरण्यावरील बंदी हटवा, नवीन शिक्षण धोरण रद्द करणे, शासकीय विभागात कोणत्याही स्वरुपाच्या खासगीकरण/कंत्राटीकरणास मज्जाव करण्यात यावा, या व इतर मागण्यांची पूर्तता न झाल्यास 14 डिसेंबरपासून सदर बेमुदत संप करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.







