| अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन जिल्ह्यामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानात शासकीय मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उप वनसंरक्षक राहुल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
अलिबाग तालुक्यातील नारंगी येथील सुपूत्र लांस हवालदार सुयोग कांबळे हे दि.29 एप्रिल 2005 पासून भारतीय सैन्यामध्ये अविरत सेवा बजावित असताना देशांतर्गत सुरक्षा संबंधी ऑपरेशन स्नो लिओपार्ड मोहिमेत पूर्व सिक्कीम येथे कार्यरत असताना दि. 04 ऑक्टोबर 2023 रोजी अचानक आलेल्या महापुरात ते वाहून गेल्याने शहिद झाले आहेत. युद्धजन्य परिस्थतीत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी युद्ध विधवा निशा कांबळे यांना ताम्रपटाचे वितरण करण्यात आले.
रायगड पोलीस दलातील शिवाजी फडतरे, अलिबागचे पोलीस उपविभागीय अधिकारी विनीतकुमार चौधरी, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच अभिजीत भुजबळ, यांना विशेष सेवा पदक प्राप्त झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. महसूल विभागातील निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे, माणगावचे तहसीदार विकास गारूडकर यांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ठ लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार 2023- प्रथम पुरस्कार विजेते – मे.सहारा रुफींग टेक्नो सोल्युशन, खोपोली ता. खालापूर यांचाही सन्मान करण्यात आला.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 ग्रामीण विभागात कु.हंस उमेश दोशी, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 शहरी विभागात कु.आवंतिका सुनिल टकले, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 ग्रामीण विभागात कु.आयुष दत्तात्रेय शिंदे यांनी यश संपादन केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
दत्तात्रेय कमलाकर कांबळे, अध्यक्ष, वक्रतुंड मित्रमंडळ, पेण, रायगड जिल्हयातील कोरोना काळात व आपात्कालीन परिस्थतीमध्ये खारीचा वाटा उचलून समाजिक बांधिलकीतून सेवा केली आहे. तसेच सामाजिक बांधिलक जपून प्रशासनास वेळोवेळी मदत केली. त्यामुळे पेण येतील वक्रतुंड मित्रमंडळाचे अध्यक्ष दत्तात्रेय कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन रायगड- नागरी संरक्षण दल उरण, आपदा मित्र, सहयाद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, रोहा, आपदग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, खोपोली, आपदा मित्र महाड, म्हसळा, अलिबाग यांचाही या निमित्ताने सन्मान करण्यात आला.