राजू शेट्टीही पेटाविरोधात आक्रमक
| कोल्हापूर | प्रतिनिधी |
माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पात नेण्यात आले. आता महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मंगळवारी (दि. 05) मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात यासाठी महाराष्ट्र सरकार पक्षकार होणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. महादेवी परत यावी, अशी आमची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितले. दरम्यान, धार्मिक पंरपरा मोडून काढण्याचा प्रयत्न पेटा संस्थेने केला असून, वनतारा येथून महादेवीला आम्ही परत आणणारच, असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीस कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, विशाल पाटील हे खासदार, विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, विनय कोरे, अमल महाडीक, विश्वजित कदम, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अशोक माने, राहुल आवाडे हे आमदार, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, अपर मुख्य सचिव (वने), प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव), जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता, भालचंद्र पाटील, सागर शंभुशेटे, आप्पासो भगाटे, सागर पाटील, ॲड. मनोज पाटील उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील नादंणी गावाच्या मठातील माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये नेण्यात आले आहे. माधुरीला नेल्यामुळे नांदणी गावातील नागरिक नाराज झाले असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. मोर्चे काढत माधुरीला नेऊ नका अशी मागणी नांदणी गावकऱ्यांनी केली होती. मात्र तरीदेखील माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये नेण्यात आली आहे.
धार्मिक पंरपरा मोडून काढण्याचा प्रयत्न पेटा संस्थेने केला आहे, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले. तर वनतारा येथून महादेवी आम्ही परत आणणारच, असा विश्वास राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला. बैठकीत पेटा ही संस्था आर्थिक अमिष दाखवून वनतारा येथे पाळीव हत्ती देण्याची सुपारी घेतली आहे, असा आरोप करून राजू शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने ज्या हत्ती वनतारा येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांची सध्या काय परिस्थती आहे, याबाबत कोणतीही तपासणी राज्य सरकारने केलेली नाही.
दरम्यान, राज्य सरकारने आज बैठक घेऊन सकारात्मकता दाखविली असली तरीही जोपर्यंत माधुरी हत्ती नांदणी मठात परत येणार नाही, तोपर्यंत अंबानी उद्योग समुहाच्या सर्व गोष्टीवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यात सुरू करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.







