कार्तिकी एकादशी निमित्त अजित पवारांच्या हस्ते शासकीय महापूजा

। पंढरपूर । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्रात तब्बल दोन वर्षानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात विठूनामाचा जयघोष घुमू लागला असून, हातात टाळ, चिपळ्या आणि गळ्यात वीणा घेत विठ्ठलाच्या गजरात तल्लीन झालेल्या वारकर्‍यांमुळे अवघी पंढरी विठूमय झालेली आहे. कार्तिकी एकादशीचा अनुपम सोहळा साजरा होत असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्रीविठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात संपन्न झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली होती. यानुसार, गेली दोन वर्षे श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनाकरिता बंद होते. त्यामुळे भाविक पंढरपुरात आले नव्हते. यात्रेची परंपरा खंडित होऊ नये, म्हणून शासनाकडून पंढरपुरात संचारबंदी लागू करीत चैत्री, कार्तिकी, माघी व आषाढी यात्रा केवळ मोजकेच पुजारी, देवस्थान समितीचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने साजरी केल्या होत्या. शिवाय या यात्रांमध्ये भाविकांना रोखण्यासाठी खास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. वारकर्‍याना पंढरपूरातच प्रवेश मिळाला नसल्याने वारकर्यांत नाराजी पसरली होती. तर गेले दोन वर्षे मंदिर बंद राहिल्याने भाविकांअभावी पंढरी नगरी सुनीसुनी भासत होती.
मात्र, आता पंढरपुरात भाविकांची मांदियाळी आढळत आहे. कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त वारकर्‍यांचे पाय पंढरपूरकडे वळले आहेत. एसटीच्या संपाचे सावट या यात्रेवर असल्यामुळे नेहमी एसटीद्वारे पंढरपुरात दाखल होणार्‍या वारकर्‍यांची संपामुळे गैरसोय झाली आहे. तरीही मिळेल त्या वाहनाने वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पुन्हा एकदा गजबजले आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराला कार्तिकी एकादशी निमित्त 14 प्रकारच्या देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुलकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे.
कोंडीबा देवराम टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई टोणगे या नांदेड जिल्ह्यातील लोह तालुकामधील निळा या गावाच्या दाम्पत्याला मानाचे वारकरी म्हणून सन्मान मिळाला. मानाचे वारकरी कोंडीबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई टोणगे यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली.

Exit mobile version