नगरपरिषदेची वसूली करताना दमछाक
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपरिषद हद्दीतील 80 हून अधिक सरकारी कार्यालयांनी घरपट्टी भरलेली नाही. तब्बल 49 लाख 13 हजार 551 रुपयांची थकबाकी आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी कार्यालयापासून थेट अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थानापर्यंत विविध विभागाने घरपट्टी थकवली आहे. मार्च महिन्यात वसूली करताना अलिबाग नगर परिषदेच्या कर्मचारी, अधिकार्यांच्या नाके नऊ आले आहे.
अलिबाग नगरपरिषदेने करवसुलीसाठी पाच वसुली पथके नियुक्त केली आहेत. घरोघरी जाऊन कर वसूल करण्याचे काम ते करत आहेत. त्यांना रहिवाशांचे सहकार्य मिळत असले तरी सरकारी कार्यालयांकडून थकबाकी वसुली करताना दमछाक होत आहे. यातील सर्वात मोठा थकबाकीदार रायगड जिल्हा परिषद आहे. त्यांनी 23 लाख 22 हजार 716 रुपये थकवले आहेत. त्या खालोखाल नगररचना कार्यालयाने 7 लाख 83 हजार 412 रुपये तर पशुसंवर्धन संचालक कार्यालयाने 6 लाख 60 हजार 569 रुपयांचा कर थकवला आहे.अलिबाग नगरपरिषदेच्या हक्काचे उत्पन्न असलेल्या घरपट्टी मालमत्ता कराचे उद्दिष्ट 12 कोटी रुपये असून 23 मार्च 2025 पर्यंत 5 कोटी 80 लाख 46 हजार 459 रुपये जमा झाले आहेत. म्हणजेच आतापर्यंत फक्त 48 टक्के कर वसूल झाला आहे. त्यामुळे विविध कर विभागाकडून थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मोठे थकबाकीदार मुख्य कार्यकारी अधिकारी 23 लाख 22 हजार 716 नगररचना कार्यालय 7 लाख 83 हजार 412 पशुसंवर्धन संचालक 6 लाख 60 हजार 569 जिल्हा रुग्णालय 2 लाख 4 हजार 624 जिल्हा शल्य चिकित्सक 2 लाख 18 हजार 997 रुपये यांचा समावेश आहे. थकबाकीमुळे काही अंशी पालिकेच्या विकासाला ब्रेक लागल्याचे बोलले जाते.
मुदतीत भरलेल्या करामुळे नागरी सुविधा, स्वच्छता राखणे, नगरपरिषदेची दैनंदिन कामे सोपी होतात. तसेच पालिकेला नवीन योजना राबवण्यास मदत होते.
सचिन बच्छाव,
मुख्याधिकारी, अलिबाग नगर पालिका