60 लाख रुपयांची खोटी बिले काढणे महागात पडणार; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
| रायगड | खास प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या हद्दीत जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून मंजूर करण्यात आलेला सुमारे 60 लाख रुपयांच्या कामांची परस्पर खोटी बिले काढल्याची तक्रार करण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्याजित बडे यांनी चौकशीचे आदेश देताच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसन्नजीत राऊत यांनी कामांची व अदा करण्यात आलेल्या बिलांची चौकशी हाती घेतली आहे.
सदरच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याने ज्यांनी बिले काढली आणि त्यांना मदत करणाऱ्या सरकारी बाबूंचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मात्र, दुसरीकडे यामध्ये सरकारी बाबू अडकणार असल्याने नेमलेली चौकशी समिती निष्पक्ष चौकशी करणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. पनवेलमधील असा प्रकार आता समोर आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये असे खोटे व्यवहार होत असल्याचे त्यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.
जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम कंत्राटदार संघटना पनवेल अध्यक्ष निलेश म्हात्रे यांनी याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्याकडे निवेदन दिले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत बडे यांनी याप्रकरणी चौकशी करून तक्रारीत तथ्य आढळल्यास पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
पनवेल तालुक्यातील उसर्ली, नेरेपाडा, शिवकर, खेरवाडी, कोळघे या ग्रामपंचायत रस्त्यांची, तर पालीदेवद ग्रामपंचायतीत संरक्षण भिंत बांधण्याचे काम जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून मंजूर करण्यात आले होते. सदरची कामे सुमारे 60 लाख रुपयांची असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. असे असतानाही या कामांची परस्पर खोटी बिले काढण्यात आल्याचे निलेश म्हात्रे यांच्या निर्दशनास आले. (दि.11) मार्च रोजी त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी वेळ न दवडता याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश बांधकाम विभागाला (दि.12) मार्च रोजी दिले. तसेच चौकशीत तथ्य आढळल्यास तक्रार दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत.