2 आणि 4 फुटांच्या नियमावलींची गौरीसुतावर मर्यादा

कोरोनामुळे ना ढोल-ताशांचा गजर, ना गुलालाची उधळण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वाढत्या कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेत राज्य सरकारने गणेशोत्सवासाठीची मार्गदर्शक तत्त्व जाहीर करीत यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची सूचना केली आहे. गेल्यावर्षी देखील कोरोनाच्या महामारीमुळे राज्यामध्ये कडक निर्बंधातच गणेशोत्सवास साजरा करण्यात आला होता. यावर्षीही कडक निर्बंध जारी करण्याचे संकेत शासनाने मार्गदर्शक सुचना प्रसिद्ध करुन दिले आहेत.

10 सप्टेंबर (गणेश चतुर्थी) ते 19 सप्टेंबर (अनंत चतुदर्शी) या काळात राज्यात सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव साजरा केला जाईल. गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे असतील.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिका वा स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. सार्वजनिक मंडळाची गणेशमूर्ती 4 फूट तर घरगुती गणपती 2 फुटांचा असावा. गणपती आणताना वा विसर्जनासाठी मिरवणूक काढता येणार नाही. शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी आणि या मूर्तीचं घरच्या घरी वा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात यावं. नागरिक देतील ती देणगी मंडळांनी स्वीकारावी. मंडप परिसरात गर्दी होऊ देऊ नये. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम सार्वजनिक मंडळांनी राबवावेत. आरती, भजन, कीर्तन करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी वेबसाईट, ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुकद्वारे दर्शनाची सोय करावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था असावी. विसर्जनाआधीची आरती घरीच करून, मग मूर्ती थेट विसर्जनासाठी आणावी. एकाच इमारतीतल्या अनेक घरगुती गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही.

Exit mobile version