गावातील भूखंड विकसकाला देण्यास ग्रामस्थांचा विरोध
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
शासन सिडकोच्या माध्यमतून स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय करीत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील यांनी केला आहे. खारघरमध्ये समाविष्ट खुटुक बांधन गावाच्या शेजारी असलेला भूखंड सिडकोने ग्रामस्थांच्या मागणीचा विचार न करता परस्पर विकसकाला दिला आहे. विकसकाला दिलेला हा भूखंड ग्रामस्थांना परत न दिल्यास सिडकोविरोधात आंदोलन करण्याचा त्यांनी दिला आहे.
खुटुक बांधण गावाच्या शेजारी सेक्टर 37 येथील भूखंड क्रमांक 4 हा भूखंड सिडकोने एका विकसकाला दिला आहे. हा भूखंड विकसकाला देण्यात ग्रामस्थांचा विरोध असून, हा भूखंड ग्रामस्थांना मैदान म्हणून मिळावा याकतिा तत्कालीन ग्रामपंचायतीने ठराव केला होता. तशा प्रकारचे पत्र मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्याकडे दिले होते. तसेच सिडको प्रशासनासोबतदेखील तशा प्रकारचा पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसे असतानादेखील विकसकाला भूखंड देण्यात आल्याने खुटुक बांधण परिसरातील ग्रामस्थ सिडको विरोधात आक्रमक झाले असून, उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याकरिता रविवारी (दि. 14) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील यांनी शासनाच्या भूमिकेवर टीका केली असून, शासन सिडकोच्या माध्यमातून स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला आहे.