गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा देण्याच्या निर्णयावरून महाराष्ट्रात बरीच उलटसुलट चर्चा झाली. भारत हा गरीब देश आहे. त्यामुळे इथल्या लोकांच्या कोणत्याही क्षेत्रातील प्रगतीच्या आकांक्षा या हमखास पगार देणारी नोकरी यासारख्या गोष्टींशी जोडलेल्या आहेत. त्यानुसार दहीहंडीतून बाहेर काढतानाच गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. जे की, प्रत्यक्षात येण्याची शक्यता शून्य आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी कबड्डीच्या धर्तीवर प्रो-गोविंदा स्पर्धा घेण्याचे जाहीर केले. जी सुरू होण्याची शक्यता मात्र पुरेपूर आणि भरपूर आहे. याचे कारण क्रीडा-प्रकार किंवा खेळ याभोवती तयार झालेले अर्थकारण. जगभरातील भांडवलवाले एका वेळी कोट्यवधी ग्राहक मिळतील आणि प्रचंड नफाही मिळेल अशा उद्योगांच्या वा कल्पनांच्या सतत शोधात असतात. खेळ हा यासाठीचा आकर्षक पर्याय आहे. सर्व खेळांभोवती मिळून 45 हजार कोटी डॉलर्स इतकी प्रचंड उलाढाल करणारी बाजारपेठ जगभर तयार झाली आहे. त्यावरून त्याचा आवाका लक्षात यावा. मुळात खेळ हे माणसांना रोजच्या धबडग्यातून काही काळाच्या विसावा मिळावा वा मनोरंजन व्हावे यासाठीचे साधन आहे. त्याचे असे व्यावयासियिकीकरण व्हावे का हा गंभीर चर्चेचा मुद्दा आहे. पण ती चर्चा करण्यासाठीदेखील आपल्याला मुळात या उद्योगाची व्याप्ती समजून घ्यायला हवी. खेळांच्या स्पर्धा हे गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांना एका ठिकाणी खेचून आणणारे साधन आहे. हे लोक स्पर्धा पाहण्यासाठी प्रत्यक्ष किंवा टीव्हीच्या वा मोबाईलच्या पडद्याच्या समोर असतात तेव्हा ते त्या सामन्याच्या तिकिटासोबतच इतर अनेक गोष्टींचे संभाव्य ग्राहक होऊ शकतात. त्यातूनच हजारो कोटींचा पसारा उभा राहतो. एखादा ग्राहक आपल्या आयुष्यात मोटार वा वॉशिंग मशीन फार तर दोन-तीन वेळा घेऊ शकतो. पण खेळांचा शौकिन आयुष्यभर सतत त्याच्या सामन्यांकडे येत राहतो. त्यामुळे ही एक अविरत किंवा न थांबणारी बाजारपेठ आहे. आणि बाजारपेठ सतत वैविध्य शोधत असते. भारतात इतकी वर्षे क्रिकेटचा दबदबा होता. अजूनही आहे. परंतु आयपीएलचा पहिल्या हंगामामध्ये त्याची जितकी हवा झाली तितकी गेल्या वर्षी झाली नाही. याचे कारण आता त्यात तोच तोपणा येऊ लागला. त्यामुळे मग मधल्या काळात प्रो-कबड्डी सुरू झाली. यंदापासून त्याच धर्तीवर खो खोच्या स्पर्धा होत आहेत. इथून पुढे आट्यापाट्याच्याही होऊ शकतील. एखादे सरकार पाठीशी असेल तर गोविंदासारख्या खेळातही पैसे घालायला भांडवलवाले तयार होतील. त्यात त्यांना भरपूर सवलती मिळतील. शिवाय निदान पहिली काही वर्षे हुकुमी प्रेक्षकरुपी ग्राहकही मिळू शकतात. आयपीएलमध्ये अंतिमतः विजेता होणारे संघ दोन-तीनच आहेत. पण त्या स्पर्धेत अत्यंत वाईट कामगिरी करणारे पंजाब इलेव्हनसारख्या संघाचे प्रायोजकही अजिबात तोट्यात नाहीत. कारण, त्यांना सामन्याची तिकिटविक्री, टीव्हीचे प्रसारणहक्क, खेळाडूंच्या बुटांपासून हेल्मेटपर्यंतच्या जाहिराती यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हिस्सा मिळतो. उद्या प्रो-गोविंदामध्येही हेच होणार आहे. त्यामध्ये ठराविक वेळात जास्तीत जास्त थर उभारणे हा सर्वात आकर्षक प्रकार असेल. हंडी फोडणे म्हणजे बहुदा कबड्डीतील लोण चढवण्यासारखे असेल. हा सर्व प्रकार प्रेक्षकांना किती काळ गुंतवून ठेवेल व त्यांना किती वेळा तेच ते पाहायला आवडेल हे आत्ता सांगणे कठीण आहे. पण भांडवलवाले, जाहिरातदार व प्रायोजक त्यातून बरोबर मार्ग काढतील. याच दरम्यान अखिल भारतीय फुटबॉल संघटनेवर आंतरराष्ट्रीय महासंघाने बंदी घातली. फुटबॉल हा जगातील सर्वात श्रीमंत व सर्वाधिक प्रेक्षकवर्ग असलेला क्रीडाप्रकार आहे. क्रिकेटच्या पाच पट म्हणजे सुमारे 2800 कोटी डॉलर्स इतकी त्याची उलाढाल आहे. भारताचा संघ किंवा कोणीही खेळाडू जागतिक पातळीवर नसला तरीही देशात कोट्यवधी लोक फुटबॉलचे वेडे आहेत. या बाजारपेठेवर जगातील सर्व कंपन्यांचा डोळा आहे. भारतीय संघटनेतील फिफाचा हस्तक्षेप हा भविष्यातील घडामोडींना वळण देण्यासाठीच्या डावपेचांचा एक भाग आहे असे म्हणतात. अंबानींची इंडियन सुपर लीग ही आठ वर्षांनंतरही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरलेली नसली तरी ती उद्यासाठीची गुंतवणूक आहे. यात दोन बडे राजकारणीही इच्छुक आहेत असे म्हणतात. एकूण गोविंदा असो की फुटबॉल, खेळ होणारच.
गोविंदा आणि फुटबॉल

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026