गोविंदाचा रोड शो फसला

कारमध्ये बसून राहिल्याने नागरिकांची नारेबाजी

| वाशीम | प्रतिनिधी |

सिनेअभिनेता गोविंदा वाशीम शहरात येणार असल्याने त्याला पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होईल, असा अंदाज होता. मात्र महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रोड शोला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. गोविंदा बाहेर कमी आणि गाडीतच जास्त असल्यामुळे त्याला पाहण्यासाठी आलेल्यांना देखील गोविंदा बाहेर या म्हणून नारेबाजी करावी लागली. तरीही तो बाहेर न आल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.

राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ गोविंदा यांच्या रोडशोला शहरात अल्प प्रतिसाद मिळाला. रोडशोला सिव्हिल लाईन येथून प्रारंभ झाला. सिव्हिल लाईन मार्गे बस स्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक या रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रोडशो झाला. यावेळी शिवसेनेच्या नेत्या तथा मुंबईच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे, आमदार लखन मलिक, राजू पाटील राजे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या रोडशो दरम्यान गोविंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करेल अशी आशा होती. लोकांनाही तसेच वाटत होते. मात्र गोविंदाने बाहेर न येता गाडीतूनच नमस्कार केल्याने शहरात नाराजीचा सूर उमटला.

Exit mobile version