माजी सरपंचांना शासनाने मानधन द्यावे: तालुका चिटणीस अजित कासार

| आगरदांडा | प्रतिनिधी |
ग्रामपंचायत हद्दीमधील गावाचा विकास तसेच प्रत्येक शासकीय योजना प्रत्यक्ष अंमलात आणण्याचे काम सरपंच करीत असतात. सरपंच म्हणून असताना तुटपुंजे मानधन दिले जात होते. परंतु, आजच्या घडीला जे सरपंच निवृत्त झाले आहेत, ज्यांनी गावासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावून वार्धक्याकडे झुकलेले आहेत, अशा लोकांना राज्य शासनाकडून मानधन देण्याची तजबीज झाली पाहिजे, अशी मागणी मुरुड तालुका शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस व वावडुंगी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजित बाळकृष्ण कासार यांनी केली आहे.

गावाचा विकास व राज्य केंद्राच्या योजना प्रत्येक गावात पूर्ण होण्यासाठी सरपंच खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. सध्याच्या घडीला काही सरपंच गावाचा संपूर्ण विकास करून निवृत्त झाले आहेत. अशा सरपंचांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत होणे खूपच गरजेचे आहे.

महिला दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाने सर्व महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के तिकीट सवलत दिली आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने ज्यांनी गावाच्या विकासासाठी आपले आयुष्य वेचणार्‍या व गावाच्या विकासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या राज्यातील सरपंचना मानधन सुरु करून मदतीचा हात द्यावा अशी मागणी कासार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली आहे.

याबाबत कासार यांनी सांगितले कि सरपंचांना मानधन मिळाले पाहिजे अशी इच्छा बहुसंख्य माजी सरपंच यांनी बोलून दाखवल्याने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Exit mobile version