दरडग्रस्त सांगवी गावाचे शासनाने पुनर्वसन करावे : दिलीप गडकरी

| कर्जत | प्रतिनिधी |
नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दरडग्रस्त सांगवी गावाचे शासनाने लवकरात लवकर पुनर्वसन करावे, अशी मागणी सामजिक कार्यकर्ते दिलीप गडकरी यांनी केली आहे.

शासनाने दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता असणाऱ्या गावांची यादी केली. त्यात राम गणेश गडकरी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांगवी गावचासुध्दा समावेश आहे. सांगवी गावचे रहिवासी व रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे सांगवी गावाचे लवकरात लवकर पुनर्वसन व्हावे यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.

राम गणेश गडकरी यांचा जन्म जरी गुजरातमधील नवसारी येथे तर निधन नागपूरजवळील सावनेर येथे झाले असले तरी त्यांच्या मराठी भाषेचा पाया रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील जीवन शिक्षण मंदिर येथे झाला. राम गणेश गडकरी यांचे मूळ गाव सांगवी असल्याने व त्यांची जमीन या गावात असल्याने ते नियमित सांगवी गावी येत असत. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांगवी येथे राम गणेश गडकरी यांचे स्मारक व्हावे यासाठी साहित्यप्रेमी व पत्रकार यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला होता.

सर्वपक्षीय नेत्यांनी याबाबत मतभेद विसरून एकत्र प्रयत्न करावे तसेच पत्रकार, साहित्यप्रेमी नागरिकांनी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा दिलीप गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version