6 जणांवर गुन्हा दाखल
। पनवेल । वार्ताहर ।
वडीलोपार्जित जागेमधील हिस्सा काका आणि त्यांच्या मुलींना मिळू नये, यासाठी जिवंत काकाला कागदोपत्री मृत झाल्याचे दाखवून पनवेलच्या रोहीदासवाडा येथील कोट्यवधींची जमीन स्वत:च्या नावावर करुन घेणार्या पुतण्याने पूर्वीचा गुन्हा लपविण्यासाठी पुन्हा बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी या पुतण्यासह 6 जणांविरोधात फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र हिरामण म्हात्रे उर्फ उरणकर याने 2011 मध्ये त्याचे काका नामदेव मारुती म्हात्रे जिवंत असताना ते मृत असल्याची बनावट आणि खोटी कागदपत्रे तयार करुन सदरची कागदपत्रे पनवेल येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केली होती. तसेच वडिलोपार्जित जमिनीचे वारस तो स्वत: आणि आत्या सुभद्रा तळकर असे दोघेच असल्याबाबची नोंदणी करुन घेतली होती.
विशेष म्हणजे त्यासाठी राजेंद्र म्हात्रे याने 22 फेब्रुवारी 2011 रोजी पनवेल कोर्टातून मिळवलेला नामदेव मारुती म्हात्रे उर्फ उरणकर यांचा वारस दाखलादेखील दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केला होता. दरम्यान, नामदेव मारुती म्हात्रे उर्फ उरणकर आणि त्यांच्या वारस असलेल्या 5 मुलींनी वर्षभरापूर्वी वडीलोपार्जित जमिनीची सामाईक वाटणी करुन घेण्यासाठी चुलत भाऊ राजेंद्र हिरामण म्हात्रे उर्फ उरणकर याच्यासोबत चर्चा केली होती. मात्र, त्यावेळी राजेंद्र म्हात्रे याने सदर मिळकतीत काका नामदेव म्हात्रे आणि त्यांच्या मुलींचा कोणताही हिस्सा अथवा अधिकार नसल्याचे सांगून त्यांना पिटाळून लावले होते. त्यामुळे नामदेव म्हात्रे आणि त्यांच्या मुलींना संशय आल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीची माहिती घेतली. त्यानंतर राजेंद्र म्हात्रे याने काका नामदेव म्हात्रे मृत झाल्याबाबतची तसेच त्यांचे वारस आपणच असल्याची बनावट कागदपत्रे तयार करुन वडीलोपार्जित जमीन स्वत:च्या नावावर करुन घेतल्याचे आढळून आले होते. त्यानंतर नामदेव म्हात्रे यांच्या वारस असलेल्या पाच मुलींनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी राजेंद्र म्हात्रेसह तिघांविरोधात फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती.
दरम्यान, आपली बनावटगिरी चुलत बहिणींच्या लक्षात आल्यानंतर राजेंद्र हिरामण म्हात्रे याने पूर्वीचा गुन्हा लपविण्यासाठी 13 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांच्या वडीलोपार्जित जमिनीबाबत चूक दुरुस्ती लेख दस्त तयार करुन त्याची नोंदणी करुन घेतली आहे. त्यात त्याने काका नामदेव मारुती म्हात्रे उर्फ उरणकरऐवजी आजोबा मारुती हिरु म्हात्रे उर्फ उरणकर मृत असल्याची नोंद करुन घेतली आहे. तसेच त्यांनी अप्पर तहसिलदार आणि शेतजमीन न्यायालयाकडून 22 फेब्रुवारी 2011 रोजी वारस दाखला काढल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे, अप्पर तहसिलदार आणि शेतजमीन न्यायालयाकडून वारस दाखला दिला जात नसताना, राजेंद्र म्हात्रे याने खोट्या माहितीद्वारे चूक दुरुस्ती लेख दस्त नोंदणी करुन शासनाची फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी राजेंद्र म्हात्रे आणि त्याची आत्या चंद्रा उर्फ संजीवनी मुकणे तसेच त्यांना या कामात मदत करणारे इतर चौघे अशा एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.