भारतीय खाद्य निगमच्या गोदामातील प्रकार
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कळंबोली येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदमात ठेवलेले शेकडो टन धान्य 7 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे भिजले आहे. पावसामुळे किती टन धान्य भिजले याचा अहवाल तयार करण्याचं काम सुरु असल्याची माहिती एफसीआयच्या अधिकार्यांनी दिली आहे.
कळंबोली लोखंड आणि पोलाद बाजार परिसरात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे 3 हजार 500 टन धान्य साठवणूक करण्याची क्षमता असलेली पाच, 5 हजार टन धान्य साठवणूक करण्याची क्षमता असलेली 15 तसेच 5 हजार टन धान्य साठवणूक करण्याची क्षमता असलेली 15 अशी 35 गोदामे आहेत. या ठिकाणी हजारो टन धान्याची साठवणूक करण्यात येते. साठवण्यात आलेले धान्य महाराष्ट्रातील विविध भागातील शिधावाटप केंद्रांना पुरवले जात असते. रविवारी 7 जुलै रोजी पनवेल तसेच परिसराला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे तालुक्यातील अनेक परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. एफसीआई परिसतील काही गोदमातदेखील पुराचे पाणी घुसले असून, गोदामातील धान्याची अनेक पोती पाण्यात भिजली आहेत. भिजलेल्या धान्यामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करण्यासाठी कर्मचार्यांचे पथक तयार करण्यात आल्याचे आणि त्यानंतर झालेल्या नुकसानीची माहिती मिळणार असल्याची माहिती एफसीआयचे अधिकारी विलास दरेकर यांनी दिली आहे.