ग्रा.पं.निवडणूक! 20 सरपंचांच्या जागांसाठी 37 तर 184 सदस्यांसाठी 298 उमेदवार रिंगणात

147 उमेदवारांची निवडणूकीतून माघार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात होणार्‍या 20 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.30) रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. यावेळी 20 सरपंच पदांच्या जागांसाठी वैध ठरलेल्या 63 उमेदवारांपैकी 26 जणांनी आली उमदेवारी मागे घेतल्याने 37 थेट सरपंचपदासाठी तर 184 सदस्यांच्या जागांसाठी वैध ठरलेल्या 419 अर्जांपैकी 121 जणांनी माघार घेतल्याने 298 उमेदवारांमध्ये निवडणूकीची रंगत लढणार आहे.

अलिबाग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यासाठी अलिबागमध्ये तीन सरपंचपदासाठी नऊ वैध अर्जांपैकी पाच जणांनी अर्ज मागे घेतल्याने चार उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर 31 सदस्यपदासाठी 88 वैध अर्जांपैकी 43 उमेदवारांनी माघार घेतल्याने 45 अर्ज शिल्लक राहिले आहेत.

पेण एक सरपंच पदासाठी 0 तर सात सदस्यपदांसाठी पाच वैध अर्जांपैकी पाचच उमेदवार शिल्लक असल्याने येथे सर्व पाचही उमेदवार बिनविरोध जाहीर करण्यात येतील असे स्पष्ट दिसते. पनवेल एक सरपंच पदासाठी वैध चार अर्जांपैकी दोघांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात दोन अर्ज उरले आहेत. तसेच 11 सदस्य पदासाठी वैध 36 अर्जापैकी 14 जणांनी अर्ज मागे घेतल्याने 22 उमेदवारांमध्ये आता थेट लढत रंगणार आहे.

कर्जत दोन सरपंच पदांसाठी सहा वैध अर्जांपैकी तीघांनी माघार घेतल्याने तीन उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. 16 सदस्यांसाठीच्या वैध 38 अर्जांपैकी 16 जणांनी माघार घेतल्यानंतर निवडणूक रिंगणात 22 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. खालापूर तालुक्यात देखील चार सरपंचपदासाठी वैध 15 अर्जांपैकी सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने 9 अर्ज कायम राहिले आहेत. तर 46 सदस्यपदासाठी वैध ठरलेल्या 102 अर्जांपैकी 20 जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता येथे 82 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशिब आजमावणार आहेत.

तर माणगाव तालुक्यामध्ये देखील 3 सरपंच पदासाठी वैध असलेल्या 11 अर्जांपैकी चौघांनी आपले अर्ज मागे घेतले त्यामुळे आता येथे सात जणांमध्ये थेट सरपंचपदासाठी निवडणूक तर 23 सदस्यपदांसाठी 42 वैध अर्जांपैकी सहाजणांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. आता 36 उमेदवारांमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाडमध्येही एक सरपंचपदासाठी 7, 13 सदस्यांसाठी वैध असलेल्या 44 पैकी 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 33 जणांमध्ये निवडणूक होईल.

तसेच पोलादपूर मध्ये चार सरपंचपदासाठी वैध 11 उमेदवारांपैकी तीघांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता आठ जणांमध्ये थेट निवडणूक रंगणार आहे. तसेच सदस्यपदासाठी 52 पैकी सहा अर्ज मागे घेतले गेल्याने 46 जणांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. तसेच श्रीवर्धन तालुक्यातील एक सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नसल्याने त्यासाठी निवडणूकच होणार नाही. तर नऊ सदस्यपदांसाठी वैध ठरलेल्या 12 अर्जांपैकी पाचजणांनी आपले निवडणूक अर्ज मागे घेतल्यानंतर आता निवडणूक रिंगणामध्ये सातच अर्ज उरले आहेत.

या निवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवार 30 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी कोण कुठे अर्ज मागे घेतील हे दिसून येईल. त्यानंतरच खरे लढतीचे चित्र स्पष्ट होईल. सदर ग्रामपंचायतीची निवडणूक 16 ऑक्टोबरला होणार आहे. तर 17 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

Exit mobile version