177 ग्रामपंचायतीच्या 168 सरपंचपदासाठी होणार निवडणूक
| अलिबाग | प्रतिनिधी |
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून गावोगावी प्रचाराचा धुरळा उडाला. मतदारांपर्यंत पोहचून मतदान करण्याचे आवाहन बैठका, सभा, घरोघरी भेटी घेऊन करण्यात आले. प्रचाराच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या असून रविवारी जिल्ह्यातील सुमारे 500 केंद्रामध्ये सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होणार आहे. त्याची तयारी प्रशासनाकडून अंतिम टप्प्यात असून शनिवारी सकाळपासून मतदान केंद्रावर हजारो कर्मचारी रवाना होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार रिंगणात उभे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून गावागावात प्रचार जोमाने करण्यात आला. इंडिया आघाडीच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. गावागावात बैठका झाल्या. प्रचार सभा घेण्यात आल्या. यामाध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरुच होते. अखेर शुक्रवारी सायंकाळी पाचनंतर प्रचार तोफा थंडावल्या. त्यामुळे आता थेट मतदानातून चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींपैकी 177 ग्रामपंचायतीमध्ये 168 सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. सदस्यपदाच्या एक हजार 854 जागांपैकी 44 जागांवर अर्ज प्राप्त झाले नाही. 564 जागांवर बिनविरोध सदस्य निवडून आले. त्यामुळे सदस्यपदांच्या 1 हजार 246 जागांसाठी निवडणूक लढविली जाणार आहे. ही निवडणूक प्रक्रीया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहेत. जिल्ह्यात सुमारे 500 केंद्रावर मतदान होणार आहे. या केंद्रावर सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक केंद्रावर सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर कोणीही गर्दी न करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.