ग्रामपंचायत निवडणूक: रायगड जिल्ह्यातील 191 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरवात

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात रविवारी (दि.18) पार पडलेल्या 191 ग्रामपंचायतींच्या मतदानानंतर आज (दि.20) मतमोजणीस सुरवात झाली आहे. या निवडणुकीसाठी एकूण 79.26 टक्के मतदान झाले आहे. या मतमोजणीबाबत जिल्ह्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एक दिवसाच्या मतदार राजाने आपले बहुमोल मत कुणाच्या पारड्यात टाकले आहे. आणि गावचा कारभारी कुणाला केले आहे हे आज जाहीर होणार आहे.

या मतमोजणीसाठी प्रत्येक तालुक्यात मतमोजणीच्या वेळा वेगवेगळ्या देण्यात आल्या आहेत. सर्वप्रथम सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणूका असलेल्या महाड तालुक्यात सकाळी 8.30 वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली आहे. उरण, सुधागड या दोन तालुक्यात सकाळी 9 वाजल्या पासून तर मुरुड, पेण, पनवेल, कर्जत, खालापूर, माणगाव, तळा, पोलादपूर, म्हसळा आणि श्रीवर्धन या दहा तालुक्यात सकाळी 10 पासून, तर अलिबाग व रोहा तालुक्यात सकाळी 11 नंतर मतमोजणीस सुरुवात होईल.

मुरुडची मतमोजणी दरबार हॉल, उरणची मतमोजणी सिडको ट्रैनिंग सेंटर बोकडवीरा, पेणची मत मोजणी केईएस हायस्कूल, महाडची मत मोजणी आंबेडकर स्मारक येथे होणार आहे. तर उर्वरित तालुक्यांची मतमोजणी तहसील कार्यालय येथे होणार आहे.

जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींसाठी 16 डिसेंबर 2022 रोजी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. अलिबाग 6, मुरुड 5, पेण 26, पनवेल 10, उरण 18, कर्जत 7, खालापूर 14, रोहा 5, सुधागड 14, माणगाव 19, तळा 1, महाड 73, पोलादपूर 16, म्हसळा 13, श्रीवर्धन 13 या तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. 240 पैकी मुरुड मधील 1, पेण 2 उरण 1, माणगाव 3, महाड 22, पोलादपूर सात अशा 49 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.

Exit mobile version