240 ग्रापमध्ये मतदारयादीचा कार्यक्रम जाहिर
अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मिनी विधानसभा समजल्या जाणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्या सुमारे 7649 ग्रामपंचायतीच्या आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने कर्मचार्यांना होऊ घातलेल्या ग्रामपंचायत मधील मतदान याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यात रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 15 तालुक्यातील तब्बल 240 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांची तारीख नजिकच्या दिवसांत जाहिर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे.
या 240 ग्रामपंचायतींमध्ये अलिबाग तालुक्यातील सहा, उरण तालुक्यातील 18, कर्जत तालुक्यातील सात, खालापूर तालुक्यातील 14, तळा तालुक्यातील एक, पनवेल तालुक्यातील 10, पेण तालुक्यातील 26, पोलादपूर तालुक्यातील 16, महाड तालुक्यातील 73, माणगाव तालुक्यातील 19, मुरुड तालुक्यातील पाच, म्हसळा तालुक्यातील 13, रोहा तालुक्यातील पाच, श्रीवर्धन तालुक्यातील 13, सुधागड तालुक्यातील 14 या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्या अनुषंगाने मतदार याद्या बनविण्याचे काम सुरू झाले आहे. या मतदार याद्यांमध्ये 31 मे 2022 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभेची मतदार यादी गृहीत धरण्यात येणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी प्रभाग निहाय यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यावर हरकती मांडण्यासाठी 13 ते 18 ऑक्टोबर हा कालावधी ठरविण्यात आला आहे प्रभाग निहाय अंतिम यादी शुक्रवार 21 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. नजिकच्या काळात याही निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी 15 तालुक्यातील या 240 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहिर झाल्या तर ती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांची रंगीत तालीम ठरण्याची शक्यता असल्याने या निवडणूकांना महत्व प्राप्त होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.