ऑगस्टमध्ये ग्रामपंचायत निवडणुका?

नेते, कार्यकर्त्यांना निवडणुकीचे वेध

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असतानाच मुदत संपलेल्या रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगूल ऑगस्ट महिन्यात वाजण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर केला असून, 9 ते 19 जुलैदरम्यान ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. दरम्यान, सरपंच आणि सदस्य होण्याची स्वप्न पाहणारे ग्रामपातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले असून, त्यांनी जोरदार तयारीही केली आहे.

जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा कारभार गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाद्वारे चालवला जात आहे. त्यामुळे गावांतील विकासावर त्याचा परिणाम होत असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती व अन्य सुविधा पुरविताना प्रशासन कमी पडत असल्याचेही बोलले जात आहे. प्रशासन राज असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या नंतर विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागून राहिले होते. आता पावसाळा सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागले आहेत. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुका यापूर्वी लागण्याची चर्चा जोरात रंगली होती. अखेर राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील 34, मुरूडमधील चार, पेणमधील 18, पनवेलमधील 15, उरणमधील आठ, कर्जतमधील 30, खालापूरमधील तीन, रोहामधील 26, सुधागडमधील सहा, माणगावमधील 21, तळामधील 18, महाडमधील 30, श्रीवर्धनमधील 16 आणि म्हसळामधील 11 अशा एकूण 240 ग्रामपंचायतींच्या मतदारयाद्यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी 9 जुलैला प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती व सूचना 15 जुलैपर्यंत दाखल करणे, तसेच 19 जुलैला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम ऑगस्ट महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

निवडणुकांना मुहूर्त कधी?
रायगड जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणूक झाली नसल्याने तेथे प्रशासक राजवट लावण्यात आलेली आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायत निवडणुकांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्युमळे गावा-गावांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी आधीपासून सुरुवात केलेली आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायती
अलिबाग : चेंढरे, वरसोली, थळ, मापगाव, सातिर्जे, आगरसुरे, झिराड, धोकवडे,
सारळ, रांजणखार डावली, रेवस, चरी, कुरकुंडी कोलटेंभी, शहापूर,
आंबेपूर, पोयनाड, कुसुंबळे, कुर्डूस, ताडवागळे, कुरुळ, बेलकडे, ढवर,
कावीर, बामणगाव, सहाण, बेलोशी, चिंचोटी, बोरघर, रामराज,
सुडकोली, वरंडे, चौल.
मुरूड : उसरोली, मजगाव, आंबोली, सावली.
पेण : गागोदे खुर्द, करंबेळी, कासू, अंतोरे, जावळी, पाबळ, वरेदी, बेणसे,
शिहू, कुहिरे, झोतीरपाडा, वढाव, शिर्की, उंबर्डे, कांदळे, रावे, शेंडोशी, जिर्णे.
पनवेल : गव्हाण, नांदगाव, पोयंजे, वांगणी तर्फे वाजे, आदई, वावंजे, शिरवली, कुंडेवहाळ, चिपळे, कर्नाळा, कराडे खुर्द, चावणे, जांभिवली, पारगाव, पळस्पे.
उरण : बांधपाडा, आवरे, गोवठणे, विंधणे, हनुमान कोळीवाडा, सोनारी, कोप्रोली, मोठी जुई.
कर्जत : आसल, माणगाव तर्फे वरेडी, शेलू, पिंपळोली, मानिवली, पाषणे, वारे, कशेळे, बीड बुद्रुक, सावळा-हेदवली, मोग्रज, बोरीवली, अंजप, चिंचवली, भालीवडी, पळसदरी, हालिवली, ममदापूर, सावेळे, खांडपे, किरवली, पाथरज, शिरसे, रजपे, जामरुंग, उमरोली, नेरळ, वाकस, तिवरे, वरई.
खालापूर : वडगांव, कलोते, नांवडे.
रोहा : आंबेवाडी, ऐनवहाळ, कडसुरे, किल्ला, कुडली, कोलाड, चिंचवली तर्फे अतोणे, जामगाव, देवकान्हे, धाटाव, धोंडखार, नेहरुनगर, पाटणसई, पिगोंडा, पिंगळसई, पुगांव, भालगांव, भिसे, मढाली, खुर्द, मेढा, वणी, वरसगांव, वाली, वांगणी, सारसोली, संभे.
सुधागड : कुंभारशेत, नागशेत, नेणवली, उध्दर, वाघोशी, चिखलगांव.
माणगांव : पोटणेर, वावे दिवाळी, विळे, वरचीवाडी, पाणसई, कोस्ते खुर्द, दाखणे, मढेगांव, तळेगांव- गोरेगांव, सुरव- तळे, निळज तळाशेत, पाटणूस, रवाळजे, साजे, सणसवाडी, साळवे, निजामपूर, पेण- तळे, साले, फलाणी.
तळा : रोवळा, वरळ, पन्हेळी, सोनसडे, काकडशेत, पिटसई, मालूक, वानस्ते, महागांव, पढवण, मेढे, बोरघर हवेली, मजगांव, शेणवली, वाशी हवेली, फळशेत- कर्नाळा, उसर खुर्द, वांजळोशी.
महाड : आंबेशिवथर, दाभोळ, जिते, कसबेशिवथर, कुंभेशिवथर, खर्डी, पांगारी, रेवतळे, सव, शिंगरकोंड, आमशेत, वाकी बुद्रूक, आंबिवली बूद्रूक, आकले, भावे, दहीवट, कांबळे तर्फे महाड, किंजळोली बूद्रूक, कुंभार्डे, निजामपूर, पाने, सांदोशी, सोनघर, तेटघर, वाळण बुद्रूक, विन्हेरे, वलंग, वरंडोली, वसाप, चोचिंदे.
श्रीवर्धन : निगडी, वडघर, खुजारे, कार्ले, आराठी, काळिंजे, दांडा, शिस्ते, गौळवाडी, नागलोली, हरेश्‍वर, भोस्ते, वडवली, बोर्ली पंचतन, वेळास, मारळ.
म्हसळा : मेंदडी, आंबेत, खारगांव बुद्रूक, कोळे, मांदाटणे, रोहिणी, खारगांव बुद्रूक, खामगांव, गोंडघर, तुरूंबाडी, चिखलप.
Exit mobile version