। अलिबाग । प्रतिनिधी ।
ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी लढा देत आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत कर्मचार्यांनी शुक्रवारी (दि.9) रायगड जिल्हा परिषदेवर ग्रामपंचायत कर्मचारी मोर्चा काढला. अलिबागमधील कर्मचारी सदनापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सरकारविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मारूती नाका ते जिल्हा परिषद कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. सेवानिवृत्तीचे वय निश्चित करा, सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द करा, किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी न देणार्या ग्रामपंचायतीवर कारवाई करण्यात यावी, भरती करताना संघटनेला विश्वासात घेऊन करावी, राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत पुणे यांच्या आदेशाप्रमाणे किमान वेतन ग्र्रामपंचायत कर्मचार्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात यावे, भविष्य निर्वाह निधी करीता ईपीएफचे खाते उघडण्यात यावे, जलसुरक्षा रक्षक मानधन वेळेवर देण्यात यावे, शंभर टक्के पदांची भरत्ती तातडीने करण्यात यावी, शनिवार रजेबाबत सर्व ग्रामपंचायतीला आदेश करण्यात यावेत, असा अनेक मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला अलिबाग रायगड जिल्हयातील असंख्य कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.
कर्मचार्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्या
रायगड जिल्ह्यामध्ये 810 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीवर काम करणार्या कर्मचार्यांची संख्या साधारणतः एक हजारहून अधिक आहे. हे कर्मचारी घरपट्टी, पाणी पट्टी वसूल करणे, कार्यालयासह परिसराची स्वच्छता राखणे, पाणी पुरवठा करणे, जलसुरक्षा रक्षक, केंद्रस्तरिय अधिकारी म्हणून काम करणे, आपत्कालीन परिस्थितीत रात्रीचा दिवस करून मदतीसाठी धावणे, शासनाच्या वेगवेगळ्या योजना जनतेपर्यंत पोहचविणे अशा अनेक प्रकारची कामे हे कर्मचारी करतात. तुटपुंज्या मानधनावर हे कर्मचारी कामे करतात. कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी रायगड जिल्हा कर्मचारी संघटना गेल्या अनेक वर्षापासून सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु सरकारकडून फक्त आश्वासने दिली जातात. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या मागण्यांकडे लक्ष द्या अशी मागणी होत आहे.