गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर
। रसायनी । वार्ताहर ।
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामविकासाच्या अनेक योजना वेळेत व नियोजन करून राबविणे गरजेचे असून त्यात आणखी नवीन योजना राबविण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा म्हणून ऑफलाईन धान्य वितरण करण्यास ग्रामसेवक, ग्रामविकास युनियन खालापूर यांनी नकार दिला आहे. या बाबतचे निवेदन गटविकास अधिकारी संदीप कराड यांना देण्यात आले.
रास्त भाव धान्य वितरण ऑनलाईन करण्यास काही तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यामुळे रास्त भाव धान्य वितरक यांनी ऑनलाईन वितरण करण्यास नकार दिल्याने, रास्त भाव धान्य वितरण ऑफलाईन करण्यास स्थानिक पातळीवर मान्यता देण्यात आली आहे, पण हे वितरण ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, स्थानिक पातळीवर असणारी शासकीय यंत्रणा यांच्या समक्ष करण्याचे निर्देश देण्यात आल्याने ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या नेमणुका महसूल विभागाने केलेल्या आहेत. धान्य वितरण या बाबतीत कुठलाही अनुभव नाही, अथवा प्रशिक्षण नाही. सरकारचे कुठलेही स्पष्ट निर्देश नसतानाही योजनेचे प्रामाणिक काम केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे गावच्या रक्तवाहिन्या आहेत. त्यामूळे त्यांना सतत गावाशी संपर्कात राहावे लागते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन खालापूर यांनी ऑफलाईन धान्य वितरण करण्यास नकार देत असल्याचे नमूद केले.







