उरणमध्ये भव्य शिवस्मारकाचे अनावरण

विंधणे गावाला शिवसृष्टीचे स्वरूप; तालुक्यातील सर्वात मोठे स्मारक

| चिरनेर | प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिवप्रेमींबरोबरच समस्त तरुणाईला प्रेरणादायी ठरावा, यासाठी उरण तालुक्यातील विंधणे गावाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ व आकर्षक तटबंदी असलेल्या भव्य शिवस्मारकाचे अनावरण गुरुवारी (दि.5) लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे विंधणे गावाला शिवसृष्टीचे स्वरूप आले असून गावाच्या सौंदर्यात भर पडली आहे.

विंधणे गावातील फ्रेंड्स फॉर एव्हर सेवाभावी संस्थेच्या अथक प्रयत्नातून तसेच ग्रामस्थांच्या लोकवर्गणीसह, लोकप्रतिनिधी, विविध कंपन्या, संघटना, संस्था, उद्योजक, कामगार या दानशूरांच्या सहकार्याने हे स्मारक उभारण्यात आले आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला गुरूवारी या स्मारकाचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, उद्योगपती पी.पी. खारपाटील, राजेंद्र खारपाटील, नगराध्यक्ष भावना घाणेकर यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी कमोठे नवीमुंबई येथील शंकुल नाशिक ढोल पथकाच्या वाद्यवृंदात आणि ‌‘जय शिवाजी, जय भवानी‌’च्या शिवगर्जनेसह फटाक्यांच्या आतषबाजीत व तुतारीच्या निनादात हा नेत्र दीपक शिवसोहळा पार पडला. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करीत मानाचा मुजरा करण्यात आला.

धायरी पुणे येथील शिल्पकार राम माळी यांनी हे 10.30 फूट उंचीचे व 1.5 टन वजनाचे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णकृती अश्वारूढ शिल्प साकारले असून, उरण तालुक्यातील हे सर्वात मोठे शिल्प आहे. साधारणता: 65 लाख रुपयांच्या निधीतून हे शिवरायांचे शिल्प उभे करण्यात आले आहे. चौथरा व तटबंदीसाठी नांदेड येथून आणलेल्या काळ्या दगडाचा वापर करण्यात आला असून, शिर्डी व ओडिसा येथील कारागिरांनी या तटबंदीचे काम केले आहे. शिवस्मारकात मावळे व तोफा अशी शिल्पे उभारण्यात आली असून, विंधणे गावात शिवसृष्टी निर्माण झाली आहे. त्यामुळे, विंधणे गावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. यावेळी महाअभिषेकाबरोबर शिवव्याख्याते धीरेंद्र ठाकूर यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. प्रसिद्ध निवेदिका रंजना केणी यांनी अभ्यासपूर्ण व प्रभावी असे सूत्रसंचालन केले.

शिवजयंतीच्या मुख्य दिवशी शुक्रवारी (दि.6) शिवबा राजांचा जन्मोत्सव, महाआरती, भव्य पालखी मिरवणूक, जुन्या कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री अंतरराष्ट्रीय किर्तीचे युवा शाहीर रामानंद उगले यांच्या पोवाडा व लोकगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या सोहळ्यास अनेक मान्यवरांसह विंधणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. फ्रेंड्स फॉर एव्हर सेवाभावी संस्था व ग्रामस्थ मंडळ यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले होते.

Exit mobile version