‘क्रीडा वीर वीरू’चे अनावरण
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात क्रीडा करंडक 2026-27 या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात स्पर्धेचा अधिकृत शुभंकर ‘क्रीडा वीर वीरू’ याचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात अनावरण करण्यात आले.
विद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थिनी व प्रमुख पाहुण्या वैदेही मोरे आणि धनेशा शिंगोटे यांच्या हस्ते वाघाच्या रूपातील ‘वीरू’ या शुभंकराचे अनावरण करण्यात आले. वाघ हा शक्ती, शौर्य, आत्मविश्वास आणि चपळतेचे प्रतीक मानला जातो. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, जिद्द, शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना रुजवण्यासाठी या शुभंकराची निवड करण्यात आली आहे. इयत्ता 1 ली ते 4 थीच्या बालगोपाळांसाठी क्रीडाकुंभ क्रीडा करंडकाचे हे सलग 17 वे वर्ष असून, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित महाराष्ट्रातील विविध विद्यालयांतील मुख्यत्वे इयत्ता पहिली ते चौथीच्या लहान विद्यार्थ्यांसाठी या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे खास आयोजन करण्यात येणार आहे. माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालयाप्रती कृतज्ञता या सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुण्या वैदेही मोरे आणि धनेशा शिंगोटे यांनी विद्यालयाप्रती आपली आत्मीयता व कृतज्ञता व्यक्त केली. विद्यालयात मिळालेले संस्कार, मूल्यशिक्षण आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांचा आजच्या जीवनात मोठा उपयोग होत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
या सोहळ्याला विद्यालयातील सर्व विभागांच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साह, क्रीडाभावना आणि शाळेप्रती असलेले प्रेम यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या कार्यक्रमाने यंदाच्या क्रीडा करंडक 2026-27 या क्रीडा महोत्सवाची दिमाखदार सुरुवात झाली आहे.
