। पनवेल । प्रतिनिधी ।
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेच्या वतीने मतदान जनजागृती कार्यक्रम (स्वीप) अंतर्गत के.एल.ई. कॉलेज, कळंबोलीमध्ये भव्य वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या वॉकथॉनची सुरुवात के.एल.ई. कॉलेज (शिवशंकर मंदिर परिसर) येथून करण्यात आली. कळंबोली सिटी हॉस्पिटल, शिव मंदिर रोड, अमर हॉस्पिटल, राजकमल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमार्गे सरळ, गुरूनानक देवजी चौक, होली स्पिरिट चर्च, गुरू रविदास चौक, डॉ. राम बाबू अदेवी हॉस्पिटल, एमएसईबी कळंबोली कार्यालय, भारत पेट्रोलियम सीएनजी पंप, सेंट सेबॅस्टियन चर्च, सेंट जोसेफ स्कूल रोड, एच.पी.सी.एल. रोड व हनुमान मंदिर रोड असा मार्ग पार करून पुन्हा के.एल.ई. कॉलेज येथे समारोप करण्यात आला. ‘लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा,’ असा संदेश या वेळी देण्यात आला. याचबरोबर निश्चितपणे मतदान करू’ अशी शपथ सहभागींकडून घेण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून के एल ई महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय मेंडुळकर, महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी नितीन साके आणि एनएसएस कार्यक्रम अधिकारी शीतल घार्गे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मतदानाचे महत्त्व पटवून देत, जास्तीतजास्त मतदान करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने पोवाड्याच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पटवून देऊन मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी मतदानविषयक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादात विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या सामाजिक व सार्वजनिक हितासाठी मतदानाचे महत्त्वाचे असल्याचे पटवून सांगितले.





