आजी-आजोबा रमले नातवंडांच्या शाळेत

नात्यातील वीण घट्ट करण्याचा आरसीएफ शाळेचा प्रयत्न

| अलिबाग | प्रतिनिधी |

वार्षिक स्नेहसंमेलन असो किंवा अन्य कोणतेही कार्यक्रम. विद्यार्थ्यांचे पालक नेहमीच शाळेत येतात. शाळेतले विश्‍व बहुतांशी आई-बाबा, शिक्षक, विद्यार्थी यांच्याभोवतीच फिरत असते. आजी-आजोबांचा नातवंडांच्या शाळेशी तसा संबंध येत नाही. मात्र, आजी-आजोबांनाही आपल्या नातवंडांच्या शाळेचे आकर्षण असते. नातवंडे आणि आजी-आजोबा हे जिव्हाळ्याचे नातं लक्षात घेत त्यांना शाळेत खास आमंत्रित केले होते. त्यांच्यासाठी त्यांच्याच नातवंडांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. निमित्त होते आजी-आजोबा दिवसाचे.


अलिबाग तालुक्यातील नुकताच आरसीएफ प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळेत ‘आजी आजोबा’ दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवानाने झाली. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका मंगला विसावे यांनी विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांचे स्वागत केले. तसेच आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासाकरिता आमचे विद्यालय कटिबद्ध आहे, असा विश्‍वास व्यक्त करुन त्यांच्या प्रगतीत आजी-आजोबा देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांचेसुद्धा अभिनंदन केले. आजी-आजोबांसाठी नातवंडे म्हणजे एक प्रकारचे टॉनिक असून, नातवंडेसुद्धा आजी-आजोबांच्या ऊबदार मायेत फार आनंदी असतात. त्यांच्यावर नकळत चांगले संस्कार घडतात याचे महत्त्व त्यांंनी थोडक्यात सांगितले. मदर्स डे, फादर्स डे जगभर साजरा केला जातो. परंतु, आजी-आजोबांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी तशी मिळत नाही. पण, आरसीएफ प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आजचा दिवस त्यांच्या आजी-आजोबांसाठी अविस्मरणीय केला, असेही त्या म्हणाल्या.

सदर कार्यक्रमात वेगवेगळ्या गाण्यांवर कोणी नृत्य सादर केले, तर कोणी आपल्या आजी-आजोबांविषयीच्या आठवणींना मनोगतातून उजाळा दिला. काहींनी तर विविध खेळ पेश केले. आजी-आजोबा आणि नातवंडे या नात्यावर बेतलेली जुनी गाणी, कविताही विद्यार्थ्यांनी सादर केल्या. यावेळी आजी-आजोबा नातवंडांसह विविध खेळ खेळले. मुले लहान असताना ती आमच्यासोबत असतात, एकदा शाळेत जायला लागली की, त्यांचे वेगळे विश्‍व तयार होते. पण, या त्यांच्या विश्‍वात त्यांनी आज आम्हालाही सामावून घेतले, याचा खरंच खूप आनंद झाला, हा उपक्रम कौतुकास्पद आहे. कधी गंमत, मस्ती तर कधी भावनिक क्षणांच्या हा कार्यक्रमामुळे आमच्या आणि नातवंडांमधील नात्याची वीण अधिकच घट्ट झाली, अशा शब्दांत आजी-आजोबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल शाळेला धन्यवाद देत, असे कार्यक्रम पुनः पुन्हा आयोजित करावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राची पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी मेहनत घेतली. शेवटी रेश्मा साळावकर यांनी आभार प्रदर्शन करीत अल्पोपहाराचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आपल्या देशाचे उत्तम नागरिक हे आजी-आजोबा घडवत आहेत, आजी-आजोबा ही एकत्र कुटुंबातील अडचण नसून, तो एक आधारवड आहे. नातवंडांना संस्कारधन सुपूर्द करताना आजी-आजोबांच्या कृतार्थतेचा अनुभव येतो. नातवंडांच्या प्रेमाने आनंदाचा ठेवा मिळतो.

मंगला विसावे, मुख्याध्यापिका
Exit mobile version