। ठाणे । प्रतिनिधी ।
आपल्या ७० वर्षीय आजीला आरे परिसरातील रस्त्याच्या कडेला सोडून जाणाऱ्या नातवासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरे परिसरातील दर्गा रस्त्यावरील निर्जन भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सकाळी आठच्या सुमारास ७० वर्षीय यशोदा गायकवाड या जखमी अवस्थेत आढळल्या होत्या. गायकवाड यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौकशी दरम्यान आजी स्वतः घर सोडून गेल्याचा दावा नातू सागर शेवाळे यानी केला. मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रणाची तपासणी केल्या नंतर नातवानेच शनिवारी पहाटे आजीला आरेच्या जंगलात सोडल्याचे उघड झाले.
आरे पोलिसांचा सागर शेवाळेच्या दाव्यावर विश्वास नव्हता. पोलिसांनी सागर शेवाळेने केलेल्या दाव्याची पडताळणी केली. पोलीस पथकाने परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासल्यावर समजले कि गेल्या शनिवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारस तीन जण गायकवाड यांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात घेऊन जात होते.अधिक चौकशी केली असता सागर शेवाळेने आपल्या कृत्याची कबुली दिली. आजीची तब्येत खालावल्याने तिला आम्ही शताब्दी रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयाने तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे तिला आरेच्या जंगल परिसरातील रस्त्याच्या कडेला सोडल्याचे त्याने सांगितले.
या तिघांविरोधात ज्येष्ठ नागरिकाला वाऱ्यावर सोडणे किंवा त्याचा पूर्णपणे त्याग केल्याप्रकरणी पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम कायद्यातील कलम २४ अन्वये, तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ (इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






