कृषीवलचा दणका
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कर्जत – नेरळ – कल्याण या राज्यमार्ग रस्त्यात असलेले दुभाजक हे गवताने भरले होते. अनेक स्वयंसेवी संघटना आणि स्थानिक वाहनचालक यांनी दुपदरी रस्त्याच्यामध्ये असलेले दुभाजकातील पावसाने वाढलेले गवत काढण्याची मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या रस्त्यावरील गवत काढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. कृषीवलच्या दणक्याने त्या रस्त्याच्या दुभाजकातील गवत काढण्याचे काम सुरु झाले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारकडून कल्याण – कर्जत रस्ता दुपदरी बनविण्यात आला. यावर्षी त्या रस्त्यातील दुभाजक यामध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवले होते. दोन फूट अंतराच्या दुभाजकात उगवलेल गवत हे साधारण पाच सहा फूट उंचीचे बनल्याने वाहनचालक यांना रस्त्यातून वाहतूक करणे धोकादायक बनले होते. त्यात मागील काही दिवस सुरु असलेल्या पावसामुळे ते गवत रस्त्याच्या मार्गिकेवर कोसळले होते. त्यामुळे स्थानिक रहिवाशी सचिन गायकवाड आणि अनेक स्वयंसेवी संस्था संघटना यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. त्याचवेळी कृषीवलनेदेखील याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आली असून कर्जतपासून डोणे रायगड जिल्हाहद्दीपर्यंत रस्त्याच्या दुत़र्फा आणि दुभाजकमध्ये असलेले गवत कापण्यास सुरुवात झाली आहे. एकावेळी चार मशीनच्या सहाय्याने गवत कापण्यात येत असून आठवड्याच्या आत गवत काढून टाकण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याने सांगितले आहे.
कर्जत राज्यमार्गावरील दुभाजक गवतमुक्त
