खडी मशिन, सुरुंग स्फोटोने आरोग्य धोक्यात

माणकिवली ग्रामस्थांची तक्रार

| खोपोली | वार्ताहर |

खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माणकीवली हद्दीमध्ये खडी मशीन मोठ्या प्रमाणावर दगड उत्खनन करत असून या परिसरात सुरू असलेल्या खडी मशीनच्या धुळीमुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत ग्रामस्थांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. या पाच दगड खान, खडी मशीन असल्याने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या खडी तयार करण्यासाठी डोंगराळ गावाजवळील जमिनीला सुरुंग लावण्याचे प्रकार होत आहेत. तर खडीचे उत्पादन करताना मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरत असुन अनेकांना आजारही जडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. संबंधित विभागाने या खडी मशीन मालकांवर नियंत्रण व नियम लावणे गरजेचे आहे, त्यामुळे संबंधित प्रशासन काय कारवाई करणार याकडे सार्‍याचे लक्ष लागून राहिले आहे.

तालुक्यातील सर्वाधिक खडी मशीन या माणकीवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत. या दगड खाणींमुळे धुळीचे साम्राज्य पसरल्याने परिसरातील नागरिक व लहान मुले धुळीमुळे त्रस्त झाले आहेत. या धुळीमुळे परिसरातील नागरिकांचा श्‍वास कोंडला जात आहे. हा भयंकर व जीवघेणा त्रास नागरीक सहन करावा लागत असून याकडे संबंधित प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची टीका या भागातील नागरीक करीत असल्याने तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. तर खडी उत्पादन करणारे क्रशर हे कारखाने गावाला लागूनच आहेत. या ठिकाणी रस्ते, आरसीसी, बांधकामांसह आदी कामांना लागणारी खडी बनविली जाते. या ठिकाणी दगड उपलब्ध करण्यासाठी येथील डोंगराळ भागाला सुरुंग लावण्याचे प्रकार नेहमीच सुरू असल्याने यामुळे जमिनीला हादरे बसत आहेत. त्यामुळे या परिसरातील अनेक घरांना तडे जाणे, हादरा बसत असल्यामुळे घरातील भांडी पडणे, विद्युत उपकरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका उद्भवत आहे. तसेच खडीचे उत्पादन करत असताना या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत असून येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे या परिसरात साधनसंपत्ती नष्ट झाली काय किंवा राहिली काय, याचे कोणालाही सोयरसुतक नसल्याचे वास्तव्याचे चित्र सध्या या ठिकाणी दिसून येते.
खाण उद्योगाच्या आसपास गावभाग, छोटी मोठी वस्ती आहे. सभोवताली डोंगरासारखा उंच भाग असल्यामुळे संपूर्ण परिसरात खडी मशीन मुळे होणारी धूळ पसरल्याचे चित्र दिसून येते. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून अधून-मधून सुटणार्‍या वार्‍याच्या वेगाने धूळ परिसरात पसरली जात आहे. त्यामुळे परिसरातील अनेकांना दमा, शिंका येणे, स्कीन ऍलर्जी, डोक्याचे केस गळणे, फुफ्फुसाचा विकार, डोळ्याची जळजळ, डोळे दुखी तर क्रेशरच्या सतत धडधडणार्‍या आवाजामुळे अनेकाना हृदय विकार जडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लहान मुलेही यातून सुटलेली नाहीत, तेही अशा धुळीच्या आजाराचे शिकार बनत चालले असल्याचे प्रतिक्रिया नागरीक व्यक्त करीत आहेत.

Exit mobile version