माथेरानमधील स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर

गॅस शवदाहिनीचे इलेक्ट्रिक दाहिनीमध्ये रूपांतर करण्याची मागणी

| नेरळ | वार्ताहर |

माथेरानमधील हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर बनला आहे. तेथील गॅस शवदाहिनी अनेक वर्षे बंद आहे. पर्यावरण दृष्ट्या संवेदनशिल असलेल्या लाकडांचा प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे गॅस शव दहिनीचे इलेक्ट्रिक दाहिनीमध्ये रुपांतर करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान स्मशानभूमीचा प्रश्न सुटावा यासाठी सनियंत्रण समितीमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली हा प्रश्न जनतेने गंभीरतेने घेतला आहे.

हिंदू स्मशानभूमी गावाच्या एका कोपऱ्यात आहे. हे शहर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असून या शहरात सनियंत्रण समितीच्या नियमानुसार जंगलातील झाडे तोडण्यास बंदी आहे. त्याचवेळी पावसामुळे कोसळलेली झाडे उचलण्यास देखील बंदी आहे. शहरात झाडे तोडण्यास बंदी असून मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात लाकडे कुठून आणायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 2002 नंतर इको सेन्सिटिव्ह झोन आल्यानंतर स्मशानभूमीतील लाकडांचा प्रश्न अनेक वर्षे गंभीर आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी 2008 मध्ये शासन दरबारी प्रयत्न करून माथेरानसाठी गॅस शवदाहिनी निर्माण करण्यात आली. काही मृतांवर त्या गॅस शव दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र येथे सर्व वस्तूंची वाहतूक माणसे करीत असतात. त्यामुळे गॅस सिलेंडर वाहून आणण्याची कसरत कर्मचाऱ्यांना करावी लागत होती. त्यामुळे अल्पावधीत गॅस शव दाहिनी बंद पडली आणि आजतागायत गॅस शव दाहिनी बंद आहे. त्यामुळे मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडे कुठून आणायची असा प्रश्न पुन्हा एकदा सतावू लागला आहे.

स्मशानभूमी ही शहराच्या मध्यवर्ती भागात आणण्यात यावी, तसेच इलेक्ट्रिक शव दाहिनी मंजूर करण्याची मागणी सनियंत्रण समितीकडे स्थानिक नागरिक करीत आहेत. त्यामुळे गॅस शव दाहिनी नंतर इलेक्ट्रिक शव दाहिनीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Exit mobile version