शेतीच्या कामासाठी बैलगाडीचे मोठे योगदान
। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
भात शेतीची कापणी झाल्यावर अनेक शेतकरी वर्ग आपल्या शेतात मळणी उभी करुन वेळ मिळाल्यास झोडणी करीत असतात. मात्र, यापासून मिळालेला पेंढा सुरक्षितस्थळी ठेवण्यासाठी शेतकरी वर्गांची मोठी धडपड सुरु आहे. पेंढा वाहनांतून वहातुक केल्यास खूप खर्च येत असतो. मात्र, एखाद्याकडे बैलगाडी असेल तर शेतीच्या कामासाठी त्यांचे मोठे योगदान ठरत असल्याचे मत राम जाधव या शेतकर्याने कृषीवलच्या प्रतिनिधी बोलताना व्यक्त केले आहे.
गुरे म्हणजे संसाराला हातभार लावणारी पाळीव जनावरे, असा उल्लेख शेतकरी वर्ग करीत आहे. उन्हाळ्यात शेतकर्याचा जास्तीजास्त वेळ शेतकामे करण्यापेक्षा जनावरांना चारा उपलब्ध करण्यामध्येच जात आहे. पुर्वी शेतात अथवा मैदानात जनावरे चरायला सोडली तरीही त्यांच्या खाद्याचा प्रश्न मार्गी लागत असे. मात्र, आता वणवे, औद्योगिकरण, माती उत्खलन, वृक्ष तोड या सर्व कारणांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यातच पाणी टंचाईची झळ निर्माण होत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. वाढत्या महागाईमुळे गाय, म्हैस, बैल या जनावरांच्या खाद्याच्या किंमीतदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, शेतकर्यांना पशुधन सांभाळणे मोठ्या कष्टाचे होत आहे.
त्यामुळे ज्या शेतकरी वर्गाकडे पशुधन आहेत त्यांना त्यांची चार्याची व्यवस्था करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागात पावसाळ्यानंतर एक-दोन महिन्यांत जनावरांच्या वैरणीचा गंभीर प्रश्न असतो. कारण जंगलात पावसाळी निर्माण होणारा चारा उन्हाळी सुकल्यामुळे त्यांचे गवतात रुपांतर होते. परंतु, वणव्यामुळे सुकलेले गवत जळून खाक होते. यामुळे शेतकरी वर्गाकडे जनावरांच्या चार्याची मोठी समस्या निर्माण होते. यामुळे भाताची झोडणी होताच वैरण साठविण्याची लगबग शेतकरी वर्गात सुरु आहे.
पुर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकरी वर्गाकडे बैलगाडी असायची. दळणवळण करण्यासाठी बैलगाडीचे मोठे योगदान होते. मात्र, शेती कमी झाल्यामुळे बैलगाडी कालबाह्य होत चालली आहे.
– लक्ष्मण जाधव, बैलगाडी मालक, आंबिवली
पूर्वी प्रत्येक घरासमोर बैलगाडी असायची. पावसाळा गेला की पुन्हा बैलगाडी रस्त्यावर दिसायची. मात्र, सध्या हे चित्र बदलत चालले आहे. आज आपल्याला बैलगाडी तुरळक प्रमाणात पहायला मिळत आहे. भविष्यात हीच बैलगाडी फक्त पुस्तकातच पहायला मिळेल का, अशी शंका निर्माण होत आहे.
– राजेश पाटील, पर्यावरणप्रेमी