महामानवाचे आंबवडे देशासाठी स्फूर्तीभूमी

राष्ट्रपती कोविंद यांचे प्रशंसोद्गार
। रत्नागिरी । वृत्तसंस्था।

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव असलेले आंबवडे येथील स्मारक हे तीर्थस्थळ म्हणून विकसित करावे आणि या गावाचे स्फूर्तीभूमी असे नामकरण करावे,अशी सूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी आंबवडे,ता.मंडणगड येथे केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी 7 नोव्हेंबर हा राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा. – रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

मंडणगड तालुक्यातील डॉ. आंबेडकर यांच्या मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे राष्ट्रपती कोविंद यांनी सपत्नीक भेट देऊन आदरांजली अर्पण केली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सविता कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, सर्वोच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई, रत्नागिरीचे पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव, खा. सुनिल तटकरे, राष्ट्रीय भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू उर्फ दादा इदाते हे व्यासपीठावर उपस्थित होते.


राष्ट्रपती कोविंद पुढे म्हणाले की, 6 डिसेंबर हा डॉ. आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. 2015 सालापासून 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जात आहे. 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांची जयंती सर्वत्र साजरी होते. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. कारण याच दिवशी 1900 साली बाबासाहेबांनी शाळेमध्ये प्रवेश घेऊन शिक्षणाचा श्रीगणेशा केला होता. मला असे वाटते की, हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून राष्ट्रीय पातळीवरील डॉ.आंबेडकरांच्या शिक्षण विषयक ओढ आणि निष्ठेचे स्मरण करुन देण्यासाठी तो साजरा करणे आवश्यक आहे. येथे बसलेल्या संसदेतील सदस्यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, मी त्यांना माझ्या परीने मदत करीन,अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याशी संबधित पाच ठिकाणांना पंचतीर्थाचे नाव देऊन केंद्र सरकारने या सर्व ठिकाणी आदंराजली अर्पण करण्याची स्तुत्य पध्दत सुरु केली आहे. त्यांची जन्मभूमी, नागपूरची दीक्षा भूमी, दिल्लीचे परिनिर्वाण स्थळ, मुंबईची चैत्यभूमी आणि लंडन मधील आंबेडकर मेमोरियल होम या पाच ठिकाणी बाबासाहेबांचा आदर्श मानणारे लोक श्रध्दाजंली अर्पण करतात. माझी केंद्र सरकरला अशी सूचना आहे की, याच मालिकेत बाबासाहेबांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे येथील स्मारकही तीर्थस्थळ म्हणून घोषित करण्यात यावे आणि या गावाचे स्फूर्तीभूमी असे नामाभिधान करण्यात यावे.


याप्रसंगी बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पालकमंत्री ङ अनिल परब यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, सविता कोविंद आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे स्वागत केले. प्रास्ताविक राष्ट्रीय भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू उर्फ दादा इदाते यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात व सांगता पोलीस बँड पथकाने राष्ष्ट्रगीताची धून वाजवून केली. सूत्रसंचालन निवेदक मनोज क्षीरसागर यांनी केले.

Exit mobile version