। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील पूनाडे येथील आदिवासी खातेदार लक्ष्मण गोप्या कातकरी यांच्या नावे सात-बारा सदरी होती. परंतु, तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांनी संगनमत करून अवैधरीत्या सात-बारावर खाडाखोड करून ही जमीन लक्ष्मण गोंद्या कातकरी यांच्या नावे केली होती. हे प्रकरण उरण सामाजिक संस्थेकडे आल्यानंतर त्या संदर्भात पनवेलच्या उप विभागीय अधिकारी यांच्या कोर्टात अपील दाखल करण्यात आले होते. यावेळी, अॅड. राजेंद्र मढवी यांनी न्यायालयात आदिवासी कुटुंबाची बाजू मांडली आणि अखेर पनवेलचे उप विभागीय अधिकारी पवन चांडक यांनी ही जमीन लक्ष्मण गोप्या कातकरी यांच्या नावे करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, यातील आरोपी तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी व तहसिलदार हे सर्व मयत असल्याने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद न करण्याचा निर्णय आदिवासी कुटुंबाने घेतला आहे.