नगरपरिषदेची ‘ग्रीन कर्जत’कडे वाटचाल

सोलर पॅनलमधून होतोय वीजपुरवठा
विजेच्या बचतीसाठी एलईडी दिवे
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत नगरपरिषदेने आपल्या शहरातील तापमानात वाढ होऊ नये आणि शहरातील पर्यावरण राखले जावे यासाठी ‘ग्रीन कर्जत’चा नारा दिला आहे. त्यासाठी आधी स्वतःपासूनच सुरुवात केली आहे. शहरात आता विजेची बचत करणारे एलईडी दिवे बसविण्यास सुरुवात केली आहे. तर, शहरातील चौक येथील विजेचे दिवे सोलरवर प्रकाशमान करण्यास सुरुवात केली आहे. कर्जत नगरपरिषदेने आपल्या कार्यालयातील वीज सोलर पॅनलचा प्रयोग करून वापरात आणली आहे.

शहरात जलसंवर्धनासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, शहरातील जुन्या आणि पुरातन विहिरींचे नूतनीकरण आणि सुशोभिकरण केले जाणार आहे. विहिरींची स्वच्छता करतानाच खोलीकरण आणि रंगरंगोटी तसेच माहितीपत्रक त्या ठिकाणी लावली जाणार आहेत. हे नूतनीकरण मार्च महिन्यात पूर्ण केले जाणार असून, सध्या त्या विहिरींमध्ये असलेल्या पाण्याचा वापर झाल्यावर ती कामे पूर्ण केली जाणार आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पालिकेने तयारी केली आहे.

कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या संकल्पनेतून कर्जत नगरपरिषद कार्यालय आता वीज संपन्न झाले आहे. पालिकेच्या कार्यालयाच्या टेरेसवर पालिकेने 30 किलो वॅट वीजनिर्मिती करणारे सोलर पॅनल बसविले आहेत. त्यातून संपूर्ण कार्यालयाची वीज बचत होऊ लागली आहे. तर, शहरातील विजेचे पथदिवे हे अपारंपरिक ऊर्जाच्या माध्यमातून आणि ग्रीन कर्जतच्या हेतूने एलईडी पध्दतीचे लावले गेले आहेत. शहरात आतापर्यंत 5000 एलईडी दिवे लागले असून, 50 ठिकाणी सोलर पॅनल चौका चौकात बसविले आहेत. त्यातून शहराचे रात्रीच्या प्रकाशात रुपडे पालटण्यास मदत झाली आहे. आगामी काळात शहरातील सर्व ठिकाणी असलेल्या पथदिव्यांवर एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत.

वसुंधरेच्या संरक्षणासाठी शपथ
शहरात माझी वसुंधरा मित्र बनवले असून, शहरात आजच्या घडीला 5000 हुन अधिकांनी वसुंधरेचे रक्षण करण्याची शपथ घेतली आहे. हे तरुण कर्जत शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांना जागरूक करण्याचे काम करीत आहेत. त्याचवेळी झाडे लावण्याचे आणि कचरा कुठेही टाकू नये त्यांचे वर्गीकरण करुन त्यांचे कचरा गाडीत संकलन करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

या सर्व प्रकल्पामुळे कर्जत शहर ग्रीन कर्जत आणि पर्यावरणस्नेही कर्जत बनविण्यासाठी वाटचाल सुरु आहे. नागरिकांना पर्यावरण राखण्याचे आवाहन आम्ही करीत असून, नागरिकदेखील तितकाच प्रतिसाद देत आहेत. – डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी

Exit mobile version