माध्यमिक शिक्षक भरतीला हिरवा कंदील

शिक्षणाधिकाऱ्यांकडून बिंदुनामावली तपासणी;
मागासवर्गीय कक्षाची अंतिम मान्यता बंधनकारक

| रायगड | प्रतिनिधी |

जिल्हा परिषदांमधील शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून, आता माध्यमिक शिक्षक भरतीलाही सुरुवात होणार आहे. ज्या अनुदानित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पदे रिक्त आहेत त्यांना प्रारंभी शिक्षणाधिकाऱ्यांकडून रोस्टर (बिंदुनामावली) तपासून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली अंतिम करून घ्यावी लागेल. शेवटी संबंधित शाळांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करावी लागणार आहे. मागासवर्गीय कक्षाने बिंदुनामावली अंतिम केल्यानंतर डिसेंबरअखेर रिक्तपदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर जानेवारीत नोंदणी केलेल्या भावी शिक्षकांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत.

गुणवत्ता यादीनुसार संबंधित शिक्षकांची नेमणूक होईल. त्याचवेळी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांची रिक्तपदे देखील भरली जाणार आहेत. पण, आता पूर्वीप्रमाणे संस्थापक ठरवेल त्याच उमेदवाराला शिक्षक म्हणून मान्यता मिळणार नाही. नोंदणीकृत उमेदवाराच्या प्राधान्यक्रमानुसार त्या उमेदवारांना संबंधित संस्थेत मुलाखतीसाठी पाठविले जाणार आहे. वशिलेबाजी, शैक्षणिक देणगी अशा गोष्टींना लगाम बसावा म्हणून शिक्षक भरती प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाने बदल केला आहे

एका पदासाठी तीन उमेदवार
खासगी अनुदानित शाळांमध्ये (माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षक भरतीची पद्धती आता बदलली आहे. आता ज्या शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली अंतिम करून घेतली आहे, त्या खासगी अनुदानित शाळांमध्ये पदे रिक्त आहेत, त्याठिकाणी एका पदासाठी तीन उमेदवार पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच संबंधित शाळांमध्ये पाठविले जातील. त्या तिघांची मुलाखत घेऊन त्यातून एकाची निवड करण्याचा अधिकार संस्थेला असणार आहे. पूर्वी, एका पदासाठी दहा उमेदवारांना पाठविण्याचा निर्णय होता, परंतु त्यात बदल करून आता एका पदासाठी तीन उमेदवार असे समीकरण आहे.
Exit mobile version