। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी वेश्वीच्या महाविद्यालयातील इतिहास विभागाकडून शुक्रवारी (दि.6) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी, पीएनपी महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
दरम्यान, इतिहास विभाग प्रमुख प्रा.मिलिंद घाडगे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणवर थोडक्यात भाष्य केले. तसेच, महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे यांनी अध्यक्षीय वक्तव्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे क्रांतिकारी असल्याचे विवेचनदेखील केले.
या महापरीनिर्वाण दिनाला महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्रा. दिनेश पाटील, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पूजा म्हात्रे, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. वृषाली घरत, प्रा. संजना पाटील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभागाचे प्रा. साईनाथ पाटील व आभार प्रा. मिलिंद घाडगे यांनी केले.







