सहाणगोठी येथे शहीद निलेश तुणतुणेंना अभिवादन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शहीद निलेश तुणतुणे ट्रस्ट व अलिबाग पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद झालेल्या अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथील भारतीय सैन्यातील गनमास्टर निलेश तुणतुणे यांच्या 24 वा स्मृतिदिनाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी निलेश तुणतुणे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
या समारंभाला जि.प अध्यक्षा योगिता पारधी, माजी सैनिक उमेश वाणी, पं.स.सभापती प्रमोद ठाकूर, उपसभापती मीनल माळी, माजी उपसभापती प्रकाश पाटील, तुणतुणे ट्रस्टचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक, माजी सभापती अनिल पाटील, होमगार्ड माजी जिल्हा समदेशक अ‍ॅड के डी पाटील,निलेशचे वडील नारायण तुणतुणे, सहाण सरपंच राखी पाटील, उपसरपंच नरेश वर्तक, अजित माळी, सैनिक कार्यालयाचे कुंभार,सहाय्यक पोलीस निरीक्षक लहानगे,पं.स.शिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा आदी उपस्थित होते.
शहीद निलेश तुणतुणे यांचे स्मारक भव्य करुन पुतळा मोठा करण्याची सुचनाही यावेळी करण्यात आली. जेणेकरुन पुढल्या पिढीला त्यांचे शौर्य लक्षात येऊन आपणही देशाचे संरक्षण करण्यासाठी बांधील असल्याची जाणीव होऊन त्यांना स्फुर्ती मिळू शकेल असा विश्‍वास जि.प.अध्यक्षा योगिता पारधी यांन व्यक्त केला. यावेळी कवी अरुण सोनावळे पाली यांनी शहिद निलेश तुणतुणे यांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. तसेच रायगड पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
लालफितीमुळे सशस्त्र मानवंदनेला उशीर
शहिद निलेश तुणतुणे यांच्या शहीद दिनानिमित्त गेली 23 वर्षे रायगड पोलीस दलाच्या वस्तीने सशस्त्र मानवंदना देत बंदुकीच्या पाच फैरी झाडल्या जातात. याबातचा पत्रव्यवहार पंचायत समितीच्या वतीने करण्यातही आला होता. मात्र जिआर तसेच इतर शासकीय सोपस्कार याकडे बोट दाखवीत रायगड पोलिसांची तुकडी 9.45 नंतर पोहचल्याने तब्बल एक तास उशिराने 10 वाजता सशस्त्र सलामी देण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती.

Exit mobile version