सरखेल आंग्रे यांना बाईक रॅलीतून अभिवादन

| अलिबाग | प्रतिनिधी |

सरखेल कान्होजी आंग्रे यांचा 294 वा स्मृतीदिन मंगळवार (दि. 4) रोजी अलिबागमध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अलिबागमध्ये सागरी सीमा मंचच्यावतीने बाईक रॅली काढून सरखेल कान्होजी आंग्रे यांना अभिवादन करण्यात आले. अलिबाग शहरातील सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या समाधी येथून रॅलीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. नौदलाचे अधिकारी आदित्य हाडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, वृषाली ठोसर, संजना किर, मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, एनसीसीचे प्रमुख प्रा. डॉ. मोहसीन खान, सागरी सीमा मंचचे प्रांत संपर्क प्रमुख अनिकेत कोंडाजी, माणुसकी प्रतिष्ठानचे डॉ. राजाराम हुलवान, सुशील साईकर, सह्याद्री प्रतिष्ठान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ग्लोबल कोकण, माणुसकी प्रतिष्ठान, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बाईक रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.एक धाव सागरी संरक्षणासाठी व सरखेल कान्होजी आंग्रे यांचा इतिहास जागृत व्हावा हा उद्देश समोर ठेवून ही रॅली काढण्यात आली. ही रॅली ठिकरूळ नाका, शिवलकर नाका, जुनी बाजारपेठ नाका , पोस्ट ऑफिस, समुद्र किनारा , बालाजी नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक , बुरूम खाण,होमगार्ड ऑफिस, दळी नगर अशी काढण्यात आली. या रॅलीची सांगता सरखेल कान्होजी आंग्रे नगर आरसीएफ (कॉलनी) प्रवेशद्वार येथे कान्होजी आंग्रे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून झाली.

Exit mobile version