स्वच्छता मोहिमेतून शिवप्रभूंना अभिवादन

सिद्धेश्‍वर परिसरातील गावे,वाड्या प्लास्टिक मुक्त
पाली/बेणसे | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील सिद्धेश्‍वर ग्रामपंचायतीने शिवजयंती निमित्त अभिनव उपक्रम राबविला. स्वच्छता अभियान राबवून ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावे व वाड्या प्लास्टिक मुक्त करण्यात आले. संकलीत केलेले प्लास्टिक पुनर्निर्माण प्रक्रिया करण्यासाठी पाठविण्यात आले.
सिद्धेश्‍वर ग्रामपंचायत हद्दीतील वावळोली, सिद्धेश्‍वर, पुई, खांडसई व कासारवाडी ही गावे व येथील वाड्यांमध्ये सुकन्या ग्रामसंघ बचतगट, शिक्षक व विद्यार्थी, ग्रामपंचायत टीम, स्वदेस आणि प्राइड इंडिया गाव समित्या आणि ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायतने सुरू केलेल्या प्लास्टिक मुक्त ग्रामपंचायत अभियानाचा भाग म्हणून स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत प्रामुख्याने गावात पडलेल्या प्लास्टिक बाटल्या, पिशव्या व विविध प्लास्टिक वेस्टन गोळा करण्यात आले. आणि ग्रामपंचायत संकलन केंद्रात जमा केले गेले. काही ठिकाणी राहिलेलं प्लास्टिक पुढील मोहिमेत गोळा केले जाणार आहे.
ही मोहीम पाहण्यासाठी तहसिलदार दिलीप रायण्णावार यांनी येथे भेट दिली. यावेळी प्लास्टिक संकलन केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणारे नंदकुमार सूरावकर, तसेच या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन कमी खर्चात ग्रामपंचायतला पिशव्या उपलब्ध करून देणारे सतीश कदम आणि त्यांचे सहकारी विलास मुंढे, सुकन्या ग्रामसंघ नवनिर्वाचित अध्यक्षा प्राची यादव तसेच अमित तांबडे यांचा तहसीलदार दिलीप रायण्णावार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच उमेश यादव, उपसरपंच योगेश सुरावकर, ग्रामपंचायत सदस्य नथुराम चोरघे, संजना फाळे, ग्रामसेवक ए. टी. गोरड, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस पाटील सुनील पोंगडे, सीआरपी स्नेहा यादव, प्राइड इंडिया प्रतिनिधी रोषणा महाले, शेखर देशमुख, महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version