भाजप कार्यकर्त्यांची तटकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी
| माणगाव | प्रतिनिधी |
राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीतील गटबाजी रायगडात पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. माणगाव येथील भाजपच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांनी खा. सुनील तटकरे यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत रायगड लोकसभेवर आपला दावा करून भाजपतर्फे धैर्यशील पाटील यांना उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीकडून रायगड लोकसभेसाठी नक्की कुणाला उमेदवारी मिळणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघातील श्रीवर्धन व महाड विधानसभा मतदारसंघातील बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन सोमवारी (दि.8) सकाळी माणगाव येथील एकता पेट्रोल पंपाशेजारील मैदानात करण्यात आले होते. या मेळाव्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आ.रवी पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आदी उपस्थित होते. या मेळाव्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी रायगडमध्ये भाजपचाच खासदार असेल, अशी जोरदार घोषणाबाजी करून रायगड लोकसभेवर आपला दावा केला.
या मेळाव्यात भाजपच्या दक्षिण रायगडातील कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असल्याचे सांगत सुनील तटकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच खासदार हा गोरगरीब जनतेची कामे करणारा असावा, असे सांगत तटकरे यांना टार्गेट केले. 2019 मध्ये ज्यांनी ज्यांनी तटकरेंना मदत केली, त्यांचीच तटकरेंनी फसवणूक केल्याची आठवणही भाजप कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना करुन दिली.
स्व. माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप व त्यांचे कुटुंबीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षात आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्यातील आमदार त्यांच्या कार्यकपद्धतीवर नाराज आहेत, असे सांगत तटकरेंना लोकसभा निवडणूक जिंकणं कठीण असल्याचेही त्यांनी जाहीरपणे सांगितले. त्यामुळे सत्तेची सर्व गणितं सोडविणाऱ्या महायुती सरकारला रायगड जिल्ह्यातील लोकसभा उमेदवारीचं गणित सुटेल की नाही? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.