| चिरनेर | प्रतिनिधी |
पुढील काळ शेतीसाठी आव्हानात्मक आहे. तरुण वर्ग शेतीकडे वळावा यासाठी काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक शेती करण्याऐवजी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. एकंदरीत शेतीतील वाढता खर्च आणि अनिश्चित बाजारपेठ यावर मात करण्यासाठी गट शेती हाच एकमेव पर्याय आहे, हा संदेश उरणच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्यावतीने माणगाव येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची नवी गुरुकिल्ली आत्मसात केली.
नेहमीच्या साचेबद्ध प्रशिक्षणांना फाटा देत पाणी फाऊंडेशनने अत्यंत रंजक पद्धतीने हे शिबीर राबवले. विविध खेळ, गटचर्चा आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. समूहाने काम करताना येणारे अडथळे आणि त्यावर एकजुटीने काढायचा मार्ग, याचे जिवंत उदाहरण या खेळांमधून मांडण्यात आले. गट शेती म्हणजे केवळ एकत्र येणे नव्हे, तर ती एक व्यावसायिक संधी आहे. या प्रक्रियेत प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी, पारदर्शकता आणि नियोजनाचे महत्त्व यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकला. उरणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता तिथल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ब्रँडिंग आणि मार्केटिंग केल्यास मोठा आर्थिक बदल घडू शकतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रशिक्षणामुळे उरण तालुक्यातील शेतीमध्ये आता सामूहिक क्रांतीचे वारे वाहू लागतील, अशी चिन्हे दिसत आहेत.






