मुरुड-विहुरच्या गट क्र.111 प्रकरण; तहसिलदाराची भूमिका संशयास्पद

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

मुरुड तालुक्यातील विहुर गावच्या गट क्रमांक 111 या विवादित जागेत सीआरझेड व एनडीझेड कायद्यांचे राजरोसपणे उल्लंघन होत आहे. या अनधिकृत बांधकामाबाबत अनेकवेळा ग्रामस्थांकडून मुद्दा उपस्थित करूनही गुरुचरण व सार्वजनिक वापर असलेल्या असलेल्या जागेसंबंधी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ग्रामस्थांनी वारंवार याविरोधात आवाज उठवून देखील या अनधिकृत वादग्रस्त विषयात तहसिलदार कागदी घोडे नाचविण्यापलिकडे काहीच करीत नसल्याने त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप विहुर ग्रामस्थांनी केला आहे. या अनधिकृत बांधकामाविरुध्द स्थानिक ग्रामपंचायतीने नोटीस पाठवून देखील अनधिकृतरित्या बांधकाम करणार्‍या जमीनधारक व विकासकाविरुध्द कारवाई केली जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

एखाद्या अनधिकृत प्रकरणाबाबत साधी तक्रार केल्यानंतर देखील त्याची दखल घेणार्‍या मुरुड तहसिलदारांनी ग्रामपंचायतीने ना हरकत न देता अनधिकृत बांधकाम ठरवून देखील त्याविरोधात कोणतीच कारवाई केली नाही. सदरच्या विवादित जागेत अनधिकृत बांधकाम करुन ते गावात नाहक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करीत आहेत. असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणात ग्रामस्थांची दिशाभूल करण्यासाठी महसूल प्रशासनाकडून केवळ कागदपत्रे रंगवली जात असून ग्रामस्थांच्या तक्रारींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असून ग्रामस्थांनी प्रतिकार केल्यास त्यांच्याविरुद्ध राजकीय दबाव तंत्राचा वापर करून पोलिस कारवाई होईल अशी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मागील काळात उपविभागीय अधिकार्‍यानी एक समिती नेमून येथील परिस्थितीची पाहणी केली. त्या समितीने दिलेल्या अहवालानुसार या ठिकाणी गट क्र.111 लगत समुद्रातील कांदळवन तोडण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मातीचे ढीग, खोदकाम, दगड, खडी, वाळू व सिमेंट काँक्रीटचे कॉलम आदी आढळले आहेत, याच कारणामुळे गावात संघर्षाची परिस्थिती निर्माण करून राजकारण तर केले जात नाही ना अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. पुढील संघर्ष टाळण्यासाठी सदर जमीन धारक व विकासका विरूध्द फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनातून ग्रामस्थांनी केली आहे.

Exit mobile version