कलिंगडाला वाढती मागणी

। तळा । प्रतिनिधी ।

कडक उन्हामुळे अंगाला चटके बसत असताना शरीराला थंडावा मिळावा यासाठी नागरिकांची पावले कलिंगड खरेदीकडे वळली आहेत. तळा शहरात कलिंगड विक्रीसाठी दाखल झाले असून, नागरिकांकडून कलिंगडाला मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.

तळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची लागवड केली जाते. तालुक्यातील वानस्ते, आमडोशी, बोरघर, बेलघर, पाचघर आदी गावे कलिंगडाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. तालुक्यात प्रतिवर्षी तीनशे ते चारशे हेक्टरवर कलिंगडाची लागवड केली जात असून, दर्जेदार उत्पादन व चविष्ठपणा यामुळे तालुक्यातील कलिंगडाला जिल्ह्यात मोठी मागणी असते. तालुक्यातील व्यापारी वर्ग कलिंगडाचे पीक तयार झाल्यावर शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन कलिंगडाची खरेदी करतात. गेल्या वर्षी प्रतिक्विंटल पाच ते सहा हजार रुपयांचा भाव असणारे कलिंगड यावर्षी दुपटीने महागले असून, यावर्षी दहा ते अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे कलिंगडाची विक्री होत आहे. प्रति हेक्टरी 200 ते 300 क्विंटल कलिंगडाचे उत्पादन होते रब्बीमध्ये बागायती म्हणून कलिंगडाचे पीक घेतले जाते. गेल्यावर्षी नोव्हेंबर पर्यंत लांबलेल्या पावसामुळे कलिंगडाची लागवड उशिरा करण्यात आली होती. हवामानातील बदल व ढगाळ वातावरणामुळे पुरेशा प्रमाणात कलिंगडाचे उत्पादन होऊ शकले नाही. त्यामुळे कलिंगडाचा भाव चांगलाच वधारला आहे.

Exit mobile version