शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेसचीही शेकापला साथ
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळत असून, मतदारांचा पाठिंबा वाढत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेसुद्धा बाळाराम पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना नवा जोश निर्माण झाला असून, तळागाळातील जनता बाळाराम पाटील यांच्या पाठीशी आहे.
शरद पवारांनी आदेश दिल्याने पनवेलमधील राष्ट्रवादी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या पाठीशी ठाम असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली. तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षातील स्थानिक कार्यकर्तेदेखील बाळाराम पाटलांबरोबरच असल्याची माहिती काँग्रेसच्या पनवेल शहर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील यांनी दिली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर लोकसभेला महाविकास आघाडी म्हणून सामोरे गेलेले शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे पक्ष एकत्रित लढले होते. परंतु, या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपला उमेदवार उभा केला. परंतु, आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षातील स्थानिक वरिष्ठ पदाधिकार्यांनी शेकापसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रचंड मताधिक्यांनी बाळाराम पाटील यांचा विजय होणार, असा विश्वास तिन्ही पक्षातील कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. बाळाराम पाटील यांनी गावभेटी घेत प्रचाराचा धडाका लावला असून, सामान्य जतनेतून त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहेत.