रायगडात 4961 मजुरांना रोजगाराची हमी

जिल्ह्यात मग्रारोहयोची 277 कामे सुरू; घरकुलांच्या कामामुळे मिळाला रोजगार

। रायगड । सुयोग आंग्रे ।

रोजगार हमी अन पगार कमी असे वाक्य प्रचलित झाले असले तरी आता रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांच्या रोजंदारीमध्ये 20 रुपयांनी वाढ झाली आहे. आता रोजगार हमी योजनेवरीला अकुशल मजुरांना 253 रुपयांऐवजी आता 273 रुपये मजुरी मिळणार आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत जॉब कार्ड मिळविलेल्या 4 हजार 961 मजुरांनी 277 कामांवर रोजंदारी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सुरु असेलल्या घरकुलाच्या कामांवर मजुरांनी जाणे पसंत केले असून सर्वाधिक 3 हजार 354 मजूर घरकुल बांधण्याच्या कामावर मजुरीसाठी जात आहेत.
रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग आणि वन विभागाच्या माध्यमातून 277 कामे सुरु आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत 95 ग्रामपंचायतींमध्ये सुरु असलेल्या 234 कामांमधून 4 हजार 499 मजुरांना रोजंदारी मिळाली आहे. यामध्ये 212 घरकुलाच्या कामावर 3 हजार 354 मजुरांना रोजंदारी मिळाली आहे. जिल्ह्यात 4 रस्ते , 7 सिंचन विहीर , 9 गुरांचे गोठे आणि 2 शोष खड्डे याचा चा समावेश आहे. या सर्व कामांवर 1 हजार 109 मजुरांना रोजंदारी मिळाली आहे. त्याचबरोबर वन विभागामार्फत अलिबाग विभागात रोपवाटिका निर्मितीचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामासाठी एका ग्रामपंचायतीमध्ये 30 मजुरांना मजुरीवर काम मिळाले आहे.
रायगड जिल्ह्यात 95 ग्रामपंचायतींमध्ये 234 घरकुलांचे कामे सुरु असून त्या कामांवर 3 हजार 354 मजुरांना रोजंदारी मिळाली आहे. यामध्ये पनवेल तालुक्यात 10 ग्रामपंचायतीमध्ये 51 घरकुलांवर 161 मजूर, उरण तालुक्यात 1 ग्रामपंचायतीमध्ये 1 घरकुलांवर 7 मजूर, पेण तालुक्यात 6 ग्रामपंचायतीमध्ये 28 घरकुलांवर 228 मजूर, कर्जत तालुक्यात 9 ग्रामपंचायतीमध्ये 56 घरकुलांवर 1344 मजूर, खालापूर तालुक्यात 8 ग्रामपंचायतीमध्ये 8 घरकुलांवर 287 मजूर, रोहा तालुक्यात 4 ग्रामपंचायतीमध्ये 6 घरकुलांवर 36 मजूर , सुधागड तालुक्यात 4 ग्रामपंचायतीमध्ये 4 घरकुलांवर 178 मजूर, माणगाव तालुक्यात 9 ग्रामपंचायतीमध्ये 18 घरकुलांवर 359 मजूर, महाड तालुक्यात 6 ग्रामपंचायतीमध्ये 8 घरकुलांवर 162 मजूर, म्हसळा तालुक्यात 10 ग्रामपंचायतीमध्ये 17 घरकुलांवर 404 मजूर आणि मुरूड तालुक्यात 6 ग्रामपंचायतीमध्ये 7 घरकुलांवर 126 मजूर आणि श्रीवर्धन तालुक्यात 4 ग्रामपंचायतीमध्ये 8 घरकुलांवर 62 मजूर रोजंदारीवर काम करीत आहेत.

कृषी विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींमध्ये फळबाग लागवडीचे नियोजन करून 41 ठिकाणी काम सुरु करण्यात आले असून 428 मजुरांना रोजगार मिल आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यात 9 ग्रामपंचायतींमध्ये सुरु असलेल्या 15 कामावर 157 मजूर , पेण तालुक्यात 2 ग्रामपंचायतीमधील 22 कामांवर 248 मजूर, कर्जत तालुक्यात 2 ग्रामपंचायतीमधील 2 कामांवर 4 मजूर, तळा तालुक्यात 1 ग्रामपंचायतीमधील 1 कामांवर 14 मजूर आणि श्रीवर्धन तालुक्यात एका ग्रामपंचायतीमधील एका कामावर 5 मजुरांना रोजंदारीची संधी मिळाली आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमध्ये एक काम सुरु असून 4 मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

Exit mobile version