पालकमंत्री मीच असणार – गोगावले

| श्रीवर्धन | वार्ताहर |

मंत्रीमंडळात खातेवाटपाचा विस्तार झाल्यानंतर पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल व रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री हा शिंदे गटाचा असेल तो ही महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघांचा आमदारच असेल, असा दावा आ.भरत गोगावले यांनी केला आहे. श्रीवर्धन येथील शासकीय विश्रामगृहात येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

तालुक्यातील आगामी निवडणुकां संदर्भात झालेल्या आढावा बैठकी वेळेस काही दिवसातच येणार्‍या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद ह्या निवडणुकां बाबतीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना गोगावले म्हणाले की, पुढील निवडणुकासाठी शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) व भारतीय जनता पक्ष ह्याची तालुक्यात युती असेल. आमचे लक्ष्य फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आहे. काही दिवसातच उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेतील उरले सुरले जे खासदार,आमदार आहेत ते ही शिंदे गटात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जी जबाबदारी मला देतील ती स्वीकारणार. विरोधकांनी देव पाण्यात धरून ठेवलेत की बाकी कोणीही पालकमंत्री होऊदे पण हा भरतशेठ व्हायला नको. पण त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार नाही. कारण आगामी काळात मीच पालकमंत्रीपदावर विराजमान झाल्याचे पहावयास मिळेल, असेही गोगावले यांनी नमूद केले.

आढावा बैठकी दरम्यान शहरातील शिंदे गटाच्या महिला शहरप्रमुख सुप्रिया चोगले, उपशहरप्रमुख सुप्रिया करदेकर, युवासेना शहरप्रमुख अजय चव्हाण, युवासेना उपशहरप्रमुख अक्षय भाटकर यांची नियुक्ती करण्यात आली. आढावा बैठकीस मतदार संघ संपर्क प्रमुख सचीन पाटेकर, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, उपजिल्हाप्रमुख शाम भोकरे, तालुकाप्रमुख प्रतोष कोलथरकर, शहरप्रमुख देवेंद्र भुसाणे, उपशहरप्रमुख सावन तवसाळकर, माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, तालुका संपर्कप्रमुख सुरेश मिरगल, भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, कॉग्रेस श्रीवर्धन तालुका अध्यक्ष विजय तोडणकर, शब्बीर उंड्रे, संतोष वेश्‍वीकर हे मान्यवर उपस्थित होते.

काँग्रेसचा पाठिंबा
श्रीवर्धन तालुक्यातील तटकरे कुटुंबाचे वर्चस्व संपवण्यासाठी तालुक्यातील शिंदे गट व भाजप युतीला राष्ट्रीय काँग्रेसचा पाठिंबा आहे. तालुक्यातील येणाऱ्या सर्व निवडणुकांवेळी कॉग्रेस पक्ष ठामपणे युतीच्या मागे असेल. श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त करायचा आहे, असे काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय तोडणकर यानी जाहीर केले.

Exit mobile version