। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आढीचा आदर्श गाव योजनेत समावेश करण्यात आला असून या गावाने नुकतेच श्रमदानातून गावाच्या विकासाची गुढी उभी केली. महाराष्ट्र शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेसाठी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती पुणे यांनी नुकतीच भेट देऊन गावाची पहाणी देखील केली.यावेळी गावाची आणि परिसराची पाहणी करण्यात आली. त्याच प्रमाणे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
कृषि उपसंचालक भालेराव व तांबे यांनी ग्रामसभेत दिलेल्या सुचनेनुसार आढी गावात आदर्श गाव योजनेचे उद्घाटन विलास चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. श्रमदानामध्ये सर्व ग्रामस्थ, महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रमदानातून नवीन आंगणवाडी इमारत बाधण्यासाठीची जागा साफसफाई, मंदिराचे साहित्य वाहतूक तसेच आढी ते गवळवाडी पायवाट रस्ता तयार करणे, इत्यादी कामे घेऊन ती आता पूर्ण करण्यात आली. आदर्श गाव योजना मंजूर झाल्यामुळे गावातील प्रत्येक घटकामध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला आहे, युवक वर्गाने मोठा पुढाकार या कामात घेतला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिला बचत गट, ग्राम कार्यकर्ता दिनेश तांबे, नरळकर यांनी विशेष मेहनत घेतली. महाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पोळ, तसेच उप विभागीय कृषि अधिकारी ताठे, कृषि पर्यवेक्षक कोकरे व ग्रामसेवक अर्बन यांनी या कामाला शुभेच्छा दिल्या.सभेला आढी, डोंगरोली, दत्तवाडी, गवळवाडी येथील सर्व महिला, ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे विलास चव्हाण, रोहित महाडिक व सर्व सदस्य, जगन्नाथ साळुंके, नितीन पवार व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.